Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखप्लास्टिक प्रदुषणाविरुद्ध लोकशक्तीचा जागर

प्लास्टिक प्रदुषणाविरुद्ध लोकशक्तीचा जागर

प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण ही वैश्विक समस्या आहे. न गंजणारे, वजनाने हलके आणि कधीही नष्ट न होणारे ही प्लास्टिकची वैशिष्ट्ये. माणसाच्या बेजबाबदार वर्तनामुळे प्लास्टिकची तीच वैशिष्ट्ये पर्यावरणाचा आणि पर्यायाने माणसाच्या गळ्याचा फास बनली आहेत. ज्या संशोधकांनी प्लास्टिकचा शोध लावला त्यांना असे स्वप्नात देखील वाटले नसेल. पॅसिफिक महासागरात मरियाना खंदक (ट्रेंच) आहे. जगातील सर्वात खोल खंदक असे त्याचे वर्णन केले जाते. तिथे सुद्धा शास्त्रज्ञांना प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या, इतका प्लास्टिकचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत आहे. जिथे जिथे माणसाचा वावर आहे तिथे तिथे प्लास्टिक पोहोचले आहे असे म्हटल्यास वावगे ठरेल का? प्लास्टिक प्रदुुषणाचे मानवी जीवन आणि जीवसृष्टीवर भयंकर दुष्परिणाम होतात. गेले काही दिवस समाजमाध्यमांवर एका मृत डॉल्फिन माशाचे छायाचित्र फिरत आहे. त्या डॉल्फिनचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. त्याच्या नाकात अडकलेली प्लास्टिक बाटलीच्या झाकणाची रिंग त्याच्या उपासमारीचे कारण ठरली आहे. ते छायाचित्र हृदयद्रावक आणि माणसाच्या बेजबाबदारे वर्तनाचे चपखल उदाहरण आहे. गायी, म्हशी आणि भटक्या कुत्र्यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्याच्या बातम्याही अधूनमधून प्रसिद्ध होतात. नाशिकची जीवनदायिनी गोदावरी नदी प्रदुषणात प्लास्टिकचा मोठा वाटा आहे. भरती ओसरल्यावर समुद्रकिनारी सगळीकडे प्लास्टिकचा थर जमल्याचे नेहमीच आढळते. इतक्या महत्वाच्या मुद्यावर ‘आपण काय करु शकतो, ती जगाची समस्या आहे’ अशीच सामान्य माणसांची भावना आढळते किंवा मी एकट्याने करुन काय फायदा होणार आहे, असा प्रश्न विचारला जातो. तथापि ठरवले तर सामान्य माणसेही बरेच काही करु शकतात. एकदा वापरुन फेकून दिल्या जाणार्‍या प्लास्टिकचा वापर जरी माणसाने विवेकपूर्ण केला तरी हा एक बदलही प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यास नक्कीच हातभार लावू शकतो. व्यक्तीसमूह आणि सामाजिक संस्था त्यांच्यापरीने स्वयंस्फुर्तीने त्यासाठी पुढाकार घेत आहेत. नाशिक प्लागॅर्स संस्थेने रामकुंड आणि परिसर स्वच्छ केला. त्या परिसरातून सुमारे 200 किलो कचरा संकलित केला. त्या कचर्‍यातही प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पात्रास मृत मासेही मोठ्या प्रमाणात आढळले. गोदावरी नदी स्वच्छतेची मोहिम यापुढेही सुरु राहाणार आहे. नाशिक परिसरातील काही पर्यावरण प्रेमी महिला एकत्र आल्या. त्यांनी एका परिसरातील भाजीबाजारात कापडी पिशव्यांचे वाटप केले. भाजी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्लास्टिक वापराचे आणि प्रदुषणाचे धोके समजावून सांगितले. प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करावे यासाठी जनजागृती केली. सगळीकडे हा उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे या महिलांनी माध्यमांना सांगितले. स्वयंप्रेरणेने असे अनेक मार्ग शोधले जायला हवेत. सामानाच्या किंवा खाऊच्या प्लास्टिकच्या पिशव्या तिरप्या कापून कापलेला तुकडा सहज फेकून दिला जातो. तो तुकडा सहसा सापडत नाही. पण तो कचरा कुठे ना कुठे जमा होत असतो. त्यामुळे तसा तुकडा न काढता पिशव्या कापता येऊ शकतात. कामासाठी घराबाहेर पडताना खिशात किंवा पर्समध्ये कापडी पिशवी ठेवता येईल. कापडी पिशवी वापरण्याला प्रतिष्ठेशी जोडला जाऊ शकते. एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्‍या प्लास्टिकचा वापर हळूहळू थांबवला जायला हवा.  लोकशक्तीचा हा जागर असाच सुरु राहावा. त्याची काळजी सरकार घेऊ शकेल का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या