नाशिक । प्रतिनिधी Nashik
माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. माझ्यावर मोक्का वगैरेसारखा गुन्हा दाखल नाही. मी कोणाचीही पदे ओरबाडून घेतलेली नाहीत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत माझा कोणताही संबंध नाही म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्यावर आणि माझ्या विकासकामांवर प्रेम करते. विश्वास ठेवते. गुन्हेगारीमुक्त मतदारसंघासाठी नाशिक पश्चिमचे मतदार मला मोठे मताधिक्य देऊन विजयी करतील, असा विश्वास नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला.
प्रचार बाईक रॅलीदरम्यान आमदार सीमा हिरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंगळवारी सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 30 मधील गणपती मंदिर, नर्सिंग कॉलेज, श्रद्धा विहार, पांडवनगरी, वडाळा म्हाडा कॉलनी, राजीव टाऊनशिप, किशोरनगर, राणेनगर आदी भागातून बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी परिसरातील महिलांनी आणि स्थानिक पक्ष पदाधिकार्यांनी हिरेंचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. क्रेनवरून भलामोठा हार घालून मोठ्या उत्साहात रॅलीची सुरुवात झाली. त्यांच्यासमवेत सतीश सोनवणे,श्याम बडोदे, सोनाली ठाकरे, सचिन कुलकर्णी, संगीता जाधव, शरद निकम ,भरत शिरसाट, जयवंत टक्के, मनीष पाटील, परेश पाटील, राम बडोदे, आशिष दाभोळकर, उदय बडोदे, अजय बडोदे, दीपक जोशी, सुजित मोरे, शुभम पारवे, परमानंद पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सीमा हिरे यांना पाठिंबा देण्यासाठी दररोज विविध संस्था संघटनांच्या बैठका होत आहेत. जाहीर पाठिंब्याची पत्रेही हिरेंना दिली जात आहेत. संत रामपाल महाराजांचे अनुयायी, अखिल भारतीय मातंग संघ, लेवा गुजर समाज महाराष्ट्र राज्य, खानदेश विदर्भ कुंभार समाज विकास समिती आणि इतर अनेक संघटना मंडळांनी पाठिंबा देऊन प्रचारात सक्रिय होण्याचे वचन आमदार हिरे यांना दिले आहे. अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्था, संघटना, मंडळे आदींकडून आमदार हिरे यांचा प्रचार हाती घेऊन प्रभागा-प्रभागात फेर्या, बैठका घेतल्या जात आहेत. पत्रकवाटप केले जात आहे. परिणामी मतदारसंघ पुन्हा भाजप, महायुती आणि आमदार सीमा हिरेमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
13-14 नोव्हेंबरला दिव्यांग नागरिकांचे मतदान होणार आहे. सर्व दिव्यांग बांधवांनी आमदार सीमा हिरे यांनाच मतदान करावे, असे आवाहन भाजप दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी केले आहे.