जळगाव – jalgaon
पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी 15 कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
महाराष्ट्रातील पहिला तीन दिवशीय “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सवाचे जळगावमध्ये मेहरूण तलावात राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उदघाटन झाले.त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, एम.टी.डी.सी.चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
जळगावकरांसाठी कायम स्वरूपी जल पर्यटन केंद्र
जळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याला लागून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटन स्थळ आहेत. जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ विकसित केली जात असून आज पाण्यातला हा बोटींचा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरूण तलावात हे जल पर्यटन प्रकल्प कायम स्वरूपासाठी राबविणार असून यासाठी 15 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले असून प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून इथे जल पर्यटन सुरु केले जाईल अशी घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तसेच 20 कोटी रुपयाचा निधी मेहरूण तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यटन मंत्र्यांनी स्पीड बोट चालवून घेतला थरारक अनुभव
अॅक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सवाची फीत कापून पहिल्यांदा बोटीतून खासदार, आमदार यांच्यासह जल पर्यटनाचा आनंद घेतला. बोट मध्यभागी गेल्यानंतर या बोटीतून स्पीड बोटीवर स्वार होऊन स्वतः हातात स्टेअरिंग हातात घेवून ताशी 90 किलोमीटर वेग असलेल्या बोटीचा थरार अनुभवला. मेहरूण तलावाला तीन फेऱ्या मारून स्वतः बरोबर बघणाऱ्यांनाही पर्यटन मंत्र्यांनी आनंद दिला.