मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असतानाच पक्षाने राजेंद्र जैन यांना संधी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री उशीरा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
येत्या १८ जून रोजी या जागेसाठी मतदान होत आहे. त्यापूर्वी आज राजेंद्र जैन राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. संख्याबळ पाहता महाविकास आघाडीकडून निवडणुकीत उमेदवार उतरवला जाणार नसल्याचे समजते. एकीकडे सुनील तटकरे यांच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी देऊन आणि दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन या दोन्ही नेत्यांची नाराजी पक्षाने दूर करून त्यांचे पुन्हा पक्षात महत्त्व वाढवल्याची चर्चा आहे.
कोण आहे राजेंद्र जैन?
प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू सहकारी
राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला.
माजी आमदार विधान परिषद सदस्य
विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.
शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान
राजकीय क्षेत्रासोबतच राजेंद्र जैन यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान राहिले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणि विदर्भातील एक नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोंदिया एज्युकेशन सोसायटी’चे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे काम पाहिले आहे.
संघटनात्मक बांधणीत अत्यंत महत्वाची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विदर्भातील संघटनात्मक बांधणीत राजेंद्र जैन यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पक्षाने त्यांच्यावर वेगवेगळ्या काळात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांची महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली होती.




