अकोले । प्रतिनीधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पूर्व संध्येला आदिवासी कार्यकर्त्यांनी पेसा प्रकरणी काढण्यात आलेल्या शासन आदेशाची होळी केली.
आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात आदिवासी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता.
महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या तालुका भाजपनेही आ. डॉ. किरण लहामटे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकोले दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता सार्वमतने व्यक्त केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (रविवार) जन संवाद यात्रेच्या निमित्ताने अकोलेत येत आहे. त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटने व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले. तर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी पेसा प्रकरणी काढण्यात आलेल्या शासन आदेशाची होळी केली.
महायुती सरकार विरुद्ध महात्मा फुले चौक येथे जोरदार घोषणाबाजी केली होती.आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात आदिवासी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कॉ. तुळशीराम कातोरे , स्वप्निल धांडे, पोपट चौधरी यांना अमित भांगरे यांच्या अकोले येथील संपर्क कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आदिवासी समाजातुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान सुमारे २५ वर्षांपूर्वीच अकोले बसस्थानकाचे उद्घाटन झालेले असून अकोले तहसील कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनही मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शिर्डी येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना पुन्हा उद्घाटनाचा घाट कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे. महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या भाजपने याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.