नवी दिल्ली | New Delhi
सातारा जिल्ह्यातील (Satara District) फलटण (Phaltan) येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून भाड्याच्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या करण्याआधी मुंडेंनी हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने, पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केला. यातील बदने याने चार वेळा बलात्कार केला तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकरने शारिरीक आणि मानसिक छळ केला, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले. या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
त्यानंतर आता याप्रकरणावर लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच संपदाला न्याय मिळाला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,”महाराष्ट्रातील (Maharashtra) सातारा (Satara) येथे छळ सहन केल्यानंतर डॉ.संपदा मुंडे यांनी केलेल्या आत्महत्येकडे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा विवेक हादरवून टाकणारी एक शोकांतिका म्हणूनच पाहिलं पाहिजे. इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एका हुशार डॉक्टर भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी पडली,” अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी खंत व्यक्त केली आहे.
तसेच “गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यांनी या निष्पाप महिलेविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. तिच्यावर बलात्कार करुन शोषण करण्यात आलं. वेगवेगळ्या वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. संपादाने केलेली आत्महत्या हे सत्तेने संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही तर ही संस्थात्मक हत्या आहे,” असेही राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पुढे ते म्हणाले, “जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोण करू शकते? डॉ.संपदा यांच्या मृत्यूने या भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आणला आहे. न्यायाच्या (Judge) या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताच्या प्रत्येक मुलीसाठी आता भीती नाही, आम्हाला न्याय हवा आहे,” असे देखील राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.




