Friday, May 3, 2024
Homeनाशिकऔषध विक्रेत्यांना सी.सी.टि.व्ही लावणे बंधनकारक

औषध विक्रेत्यांना सी.सी.टि.व्ही लावणे बंधनकारक

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

देशभरात अंमली पदार्थांचा (Drugs) गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला (Illicit drug trafficking) प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने होणार्‍या अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक जिल्ह्यात (nashik district) अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे (cctv camera) लावणे अनिवार्य केले असल्याचे आदेश नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan d.) यांनी जारी केले आहेत.

- Advertisement -

यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शेड्युल एक्स, एच व एच 1 औषधे व इन्हेलर विकणार्‍या औषध विक्रेत्यांनी (Pharmacists) अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे हाताळण्यासाठी मदत व्हावी या हेतुने संयुक्त कृती आराखड्यामध्ये नमूद केल्यानुसार फौजदारी प्रक्रीया 1973 चे कलम 133 अन्वये यासंदर्भात सदरचे आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे गंगाथरन डी. यांनी नमूद केले आहे.

या आदेशात पुढे असेही म्हटले आहे की, शेड्युल एक्स, एच व एच.1 औषधे व इन्हेलर विक्री करणारे औषधे विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात सी.सी.टीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. तसेच दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे (cctv camera) दर्शनी भागात लावावेत. जिल्हा औषध नियंत्रण विभागाने (District Drug Control Department) नाशिक ग्रामीण विभागातील (Nashik Rural Division) सर्व औषध विक्रेते दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत किंवा नाही याबाबत पडताळणी करावी. हे आदेश दि.23 मार्च रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सर्व औषध विक्रेते दुकानदारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे. दिलेल्या कालावधीत औषध विक्रेते दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील (Nashik Rural Division) सर्व औषध विक्रेते दुकानदार यांना पालन करणे बंधनकारक असल्याचेही जारी केलेल्या आदेशात नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नमूद केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय स्वागतार्ह शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह्य आहे. कारण मानसिक विकारासाठी दिली जाणारे औषधे समाजात व्यसनासाठी वापरली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अशी औषधं वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुणीही विकत नाही. त्यासंदर्भात नोंदी ठेवल्या जात असल्यातरी अशा औषधांची विक्री होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी क्लोज सर्किट कॅमेरे बंधनकारक केले आहेत. या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

– निलेश पाटील, उपाध्यक्ष नाशिक जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असो.

ऑनलाईन औषध विक्रीला निर्बंध हवे सीसीटीव्ही कॅमेरे मेडिकलमध्ये बसवणे ही चांगलीच बाब आहे. याचे आम्ही स्वागतच करतो. पिंपळगाव बसवंत मध्ये 70 ते 80 टक्के दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. मेडिकल मधून एच व एच 1 औषधे व इन्हेलर विक्रीसाठी वैद्यकीय शिफारस महत्वाची असते. त्याशिवाय ही औषधं विकली जात नाही. आज देशभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने औषध विक्री होत आहे. त्यावर कसे निर्बंध घालणार? त्यावर निर्बंध घातले गेल्यास अंमली पदार्थांचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध आपोआप बसेल. नुसते मेडिकल मध्ये कॅमेरे बसवून फारशे यश साध्य होईल असे वाटत नाही.

– किरण भास्कर संधान, समाधान मेडिकल/फार्मा

- Advertisment -

ताज्या बातम्या