राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उल्लेखनीय, धाडसी व प्रभावी कामगिरीबद्दल काल प्रजाकसत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला उत्कृष्ट सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पदक’ बहाल करून गौरविण्यात आले.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पुणे ग्रामीणसह मुंबई, सातारा, नागपूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांत सेवा बजावताना गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी संघटित गुन्हेगारी, जबरी चोरी, खून, खंडणी, घरफोडी, अवैध शस्त्रसाठा, दरोडे तसेच महिलांवरील अत्याचार प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस आणले. नगर जिल्ह्यात कार्यरत असताना अवघ्या काही महिन्यांत 22 गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून तब्बल 81 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच विविध राज्यांतून फरार असलेले गुन्हेगार अटक करून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना अवैध शस्त्रनिर्मिती, देशी कट्टे, कोयते, तलवारी जप्त करत मोठी कारवाई करण्यात आली. यासोबतच कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संघटित टोळ्यांचे कंबरडे मोडण्यात आले. निवडणूक काळात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कामगिरीचेही विशेष कौतुक झाले आहे. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी वैद्यकीय सुविधा, जीवनावश्यक साहित्य व सुरक्षिततेसाठी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले. त्यांच्या कार्यशैलीमुळे जनतेमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण झाला आहे. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, धाडस, उत्कृष्ट तपास कौशल्य आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर त्यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शेवगावचे भूमिपूत्र कराड यांनाही राष्ट्रपती पदक
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील भूमिपुत्र व सध्या मुंबई येथे पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे शाखा) म्हणून कार्यरत असलेले पुरुषोत्तम नारायण कराड यांची उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी दिल्या जाणार्या भारत सरकारच्या राष्ट्रपती पदकासाठी निवड जाहीर झाली आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या कराड यांनी लोकसेवा आयोगामार्फत 2002 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेत प्रवेश केला. सेवाकाळात त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. गुन्हेगारी नियंत्रण, जनतेशी थेट संवाद, तक्रार निवारण, महिला व बालसुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात दाखवलेली तत्परता ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संवेदनशील व गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास करण्यात आला असून त्यामुळे पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व जनसामान्यांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. 2010 मध्ये त्यांची पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती झाली, तर 2014 मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेचे पद मिळाले. त्यांनी गोंदिया, सोलापूर, गडचिरोली, नवी मुंबई आदी जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे. यापूर्वी केंद्र शासनाचे अंतर्गत सुरक्षा सेवा पदक, राज्य शासनाचे खडतर सेवा पदक, कमांडो फोर्समधील उत्कृष्ट कामगिरीसाठी फोर्स वन पदक, तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांचे पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकासाठीच्या निवडीबद्दल शेवगाव तालुक्यासह ढोरजळगाव परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.




