राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील काही यात्रेकरु संगमनेर तालुक्यातील खांबा येथे 29 डिसेंबर रोजी सायंकाळी यात्रेसाठी गेले असता त्यांना लाकडी दांडे व दगडाने मारहाण करुन चारचाकी गाडी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत म्हैसगाव ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील खांबा येथे दि. 29 डिसेंबर रोजी मोठ्या बाबाचा यात्रोत्सव सुरु होता. सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील काही भावीक यात्रेसाठी खांबा येथे गेले होते. त्यावेळी तेथे गाडीचा कट लागल्याचा कारणावरून वाद निर्माण झाला.
मात्र त्यानंतर काही लोकांकडून म्हैसगाव येथील यात्रेकरू महिला व पुरुषांना लाकडी दांडे व दगडगोट्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच म्हैसगाव येथील यात्रेकरुंची चारचाकी गाडी पेटवून देण्यात आली. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर इरटिगा चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.
दरम्यान, काल दि. 30 डिसेंबर रोजी म्हैसगाव येथील आठवडे बाजार असल्याने बाजारात खांबा परिसरातील काही बाजारकरु आले असता पुन्हा वाद निर्माण झाला. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन गावकर्यांची समजूत काढली.
म्हैसगाव येथील पिडितांनी व गावकर्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रसंगी काही काळ म्हैसगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. मात्र गावकरी व पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाल्याने तेथील वाद मिटला. मात्र म्हैसगाव येथील तरुण आश्वी येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असल्याची समजते.




