Saturday, May 18, 2024
Homeनगरखडी व क्रश सॅण्ड अभावी बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट

खडी व क्रश सॅण्ड अभावी बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट

पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpari Nirmal

नद्यांना पाणी असल्याने वाळू मिळत नाही. त्याऐवजी क्रश सॅड, खडी डस्टचा पर्यायी वापर होतो. मात्र खडी क्रशर बंद असल्यामुळे बांधकाम क्षेत्राला आवश्यक असणारी खडी, क्रश सॅण्ड व डस्ट मिळणे अवघड झाले आहे. जरी मिळाली तरी दुप्पट, तिप्पट भाव वाढल्याने बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट पसरले आहे. कर्ज काढून घर बांधणार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले असून बांधकाम क्षेत्राशी निगडीत व्यापारी, मजूर व कामगार, गवंडी, विट निर्माते यांचेही व्यवसाय ठप्प झाले आहेत.

- Advertisement -

पावसाळा संपल्यावर बांधकामांना तेजी येत असते. मात्र चालू वर्षी चित्र वेगळे आहे. बांधकाम क्षेत्राचा आत्मा समजले जाणारे खडी क्रशर बंद आहेत. नद्यांना पाणी असल्याने वाळू मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे वाळूला स्वस्त पर्याय म्हणून बहुतांश लोक बांधकामासाठी क्रश सॅण्ड व खडीच्या डस्टचा वापर करतात. तसेच बांधकामाच्या पाया भरणीपासून खडी हा घटक आवश्यक असतो.

फुटींगपासून ते स्लॅबच्या सेंटरींग कामासाठी खडी आवश्यक असते. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून मेंढवण, कौठे कमळेश्वर परिसरातल्या खडी क्रशर बंद आहेत. त्यामुळे बांधकामासाठी खडी, क्रश सँड व खडी डस्ट मिळत नसल्याने बांधकामे ठप्प झाल्याचे चित्र आहे. मिळाल्या तरी बाजार भावापेक्षेपेक्षा दुप्पट तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट पसरले आहे.

स्टील, सिंमेट या विक्री व्यवसायासह विट विक्रीही मंदावली आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेले मजूर, गवंडी व अभियंते यांच्यावरही बेकारीची कुर्‍हाड कोसळल्याचे चित्र आहे. चार महिन्यांपूर्वी सुरळीत सुरू असलेल्या स्टोन क्रशर अचानक रातोरात का बंद झाल्या हा मोठा गहन प्रश्न आहे. त्या जर नियमात नव्हत्या तर एवढे दिवस कशा चालू होत्या? त्यांना कोणाचा आशिर्वाद होता. हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. मात्र या साठमारीत सर्वसामान्य जनतेची होरपळ होत असल्याने संबंधित विभागाने यामध्ये योग्य तो सुवर्णमध्य काढून या खडी क्रशर पूर्ववत सुरू कराव्यात व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या