Monday, November 25, 2024
Homeब्लॉगयुगप्रवर्तक सावित्रीबाई

युगप्रवर्तक सावित्रीबाई

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

असे गर्जूनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा

परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा

- Advertisement -

या काव्यपंक्ती आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या. सावित्रीबाई म्हणजे स्री शिक्षणाची अग्निशलाका!

सातारा जिल्ह्यातील नायगाव या लहानशा खेड्यात संपन्न शेतकरी कुटुंबात सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंच्या जन्मतिथीची नोंद सरकार दरबारात तारखेस उपलब्ध आहे, ही त्यांच्या कुटुंबाची तत्कालीन सुजाणपणाची साक्ष देणारी गोष्ट आहे. खंडोजी नेवासे पाटील यांची सावित्री ही ज्येष्ठ कन्या. उंच, गोरीपान, सुंदर आणि वडिलांप्रमाणेच नेहमी गोरगरिबांच्या सहाय्याला धावून जाणारी, तीक्ष्ण बुद्धीची आणि जिज्ञासू अशी होती. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी पुणे येथील तेरा वर्षांच्या ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याबरोबर झाला. सासर घरी येईपर्यंत सावित्रीबाईंना अक्षर ओळख नव्हती. ज्योतिरावांना सांभाळणार्‍या त्यांच्या नात्यातील सगुणाबाईंचा सावित्रीबाईंना प्रेमळ सहवास लाभला. लग्नानंतर ज्योतिराव इंग्रजी शाळेत पुढील शिक्षण घेऊ लागले. नवीन गोष्ट शिकण्याची आवड असणार्‍या जिज्ञासू सावित्रीला आणि सगुणाबाई यांनाही ते लिहायला-वाचायला शिकवू लागले. सावित्रीबाईंनी शिक्षणात चांगली गती प्राप्त केली. मिसेस मिचेल बाईंनी ज्योतिरावांच्या विनंतीवरून दोघींची परीक्षा घेतली. त्या दोघी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. त्याकाळी स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. तरीही ज्योतिबांच्या इच्छेनुसार आणि स्वबुद्धीने 1947 मध्ये मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रशिक्षित शिक्षिकेचा ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला. यानंतर अहमदनगरच्या फेरार बाईंकडे जाऊन मुलींना शिकवण्याचे कसब आणि प्रशाळेच्या प्रशासनासंदर्भात मार्गदर्शन घेतले. सावित्रीबाई महाराष्ट्रातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका झाल्या.

आपल्या देशाची खरी सुधारणा स्त्रिया आणि अज्ञानी शुद्रातिशुद्रांना शिक्षण दिल्याशिवाय होणार नाही असा पुरोगामी विचार ज्योतिरावांच्या मनात कायम घोळत असे. त्यासाठी त्यांनी शाळा काढण्याचे ठरवले. त्यातही त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले. ज्योतिरावांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात भारतातील पहिली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक केली. यावेळी सावित्रीबाईंचे वय अवघे 18 वर्षांचे होते. सुरुवातीला केवळ सहा मुली शाळेत येत होत्या. पालक मुलींना शाळेत पाठवायला तयार नसत. परंतु सावित्रीबाईंची मुलींच्या शिक्षणाविषयीची कळकळ आणि कार्यनिष्ठेमुळे 1852 पर्यंत पुणे आणि सातारा परिसरात जवळजवळ 18 शाळा सुरू झाल्या. संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षिका असे तिहेरी कर्तव्य त्यांनी कर्मनिष्ठतेने पार पाडले. बहुजन समाजातील एक स्त्री शिक्षण घेऊन मुलींना शिकवते त्यामुळे तत्कालीन समाजाने सावित्रीबाईंना अनेकानेक प्रकारे त्रास दिला. मोठ्या कठीण संकटांचा सामना करत सावित्री ज्योतिबांच्या शाळा वाढत होत्या. समाजातील उच्चवर्णीयांबरोबरच अस्पृश्य मुलींसाठीही फुले दाम्पत्यांनी शाळा सुरू केल्या.

आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण असतानाही सावित्रीबाईंनी शाळेचे अध्यापन आणि व्यवस्थापन यात तन-मन-धन वेचून काम केले. ज्योतिराव-सावित्रीच्या शैक्षणिक चळवळीने प्रभावित होऊन अनेक मित्र त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. सावित्रीबाईंच्या हाताखाली शिकून अनेक विद्यार्थिनी तयार झाल्या. सावित्रीबाईंच्या मार्गदर्शनाने फातिमा शेख आणि मुक्ताबाई साळवे यांसारख्या शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणार्‍या त्यांच्या विद्यार्थिनी पुढील काळात तयार झाल्या.

1852 साली पुणे विभागाच्या शिक्षण मंडळातील दादोबा तर्खडकर यांनी सावित्रीबाईंच्या शाळेतील 237 मुलींची परीक्षा घेतली. या मुलींची प्रगती लक्षणीय होती. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मुलींच्या बक्षीस समारंभास इंग्रज अधिकारी आले. त्यावेळी मुली म्हणाल्या, आम्हाला बक्षीस म्हणून खाऊ, पैसे नको तर शाळेला ग्रंथालय हवे. यावरून सावित्रीबाईंनी वाचनाचे संस्कार मुलींवर बिंबवले होते हे लक्षात येते. सावित्रीबाईंनी इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्या स्वतः इंग्रजी लिहिणे- वाचणे शिकल्या. संस्कृत भाषेच्याही त्या चांगल्या जाणकार होत्या.

शिक्षण घेऊन शिक्षिका होणार्‍या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूलची स्थापना केली. निरक्षर प्रौढांना शिकवण्यासाठी त्यांनी रात्र शाळा सुरू केल्या. शिक्षणाने मनुष्य आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण व्हावा यासाठी श्रमप्रधान शिक्षणावर त्यांनी भर दिला. शिक्षणाने मनुष्यामधील पशुत्व जाऊन मनुष्यत्व जागे होते ही शिकवण या दाम्पत्याने कृतीतून समाजाला दिली. अस्पृश्यता, जातीभेद नष्ट करण्यासाठी या महात्म्यांनी स्वतःच्या वाड्यातील पाण्याचा हौद लोकांसाठी खुला करून दिला. अस्पृश्यता, जातीभेद नाहीसा व्हावा यासाठीही सावित्रीबाईंनी ‘महिला सेवा मंडळाची’ स्थापना करून संक्रांतीच्या हाळदी-कुंकुवाचा कार्यक्रम सर्व जातीय महिलांसाठी एकत्रित घेतला. त्या काळातील त्यांचे हे प्रयत्न खूप मोठे होते. निराश्रीत विधवा, असहाय्य स्त्रियांसाठी विधवा आश्रम सुरू केले. त्याचप्रमाणे फसवल्या गेलेल्या विधवा स्त्रियांसाठी त्यांनी 28 जानेवारी 1863 ला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या गृहाला जोडून सुतिका गृह आणि अनाथ बालकाश्रम स्थापन करून समाजाकडून फसवल्या गेलेल्या विधवांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी आईच्या मायेने केली. अनेक नवजात मुलांचे संगोपन केले. विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले. विधवांची केशवपण करण्याची अमानुष प्रथा बंद व्हावी यासाठी ज्योतिबा-सावित्रींनी नाभिकांचा संप घडवून आणला. अशाप्रकारे नाभिकांचा संप यशस्वीपणे घडवून आणणे ही त्याकाळातील फार मोठी सामाजिक क्रांती होती.

ज्योतिबांबरोबर जगाचा संसार करता करता सावित्रीबाई भान विसरून गेल्या. त्यांना स्वतःचे अपत्य झाले नाही. तेव्हा विचारपूर्वक ज्योतिबा-सावित्रीबाईंनी विधवा काशीबाईच्या यशवंत या मुलास दत्तक घेतले. पुढे त्यांनी त्याला चांगले शिक्षित करून डॉक्टर बनवले. पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, डॉ. रुक्मिणीबाई गायकवाड या शिक्षित स्त्रिया सावित्रीबाईंना भेटायला येत असत.

सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्त्व अतिशय कार्यतत्पर असे होते. ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांनी भरीव योगदान दिले. सावित्रीबाई या कृतिशील समाजसेविका होत्या. त्याबरोबरच त्या एक स्वतंत्र प्रतिभासंपन्न वैचारिक समृद्धी असणार्‍या साहित्यिक होत्या. ‘काव्यफुले’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

धोंडे मुले देती। नवसा पावती

लग्न का करती। नारी नर

यातून त्यांच्या काव्यप्रतिभेबरोबर वैचारिक वैभवाचे दर्शन घडते. ज्योतिरावांविषयी कृतार्थ भाव व्यक्त करणारे ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हे दीर्घ काव्य ओघवत्या प्रासादिक शैलीत आणि कोमल पद्धतीने लिहिले आहे.

28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांनी या इहलोकीची यात्रा संपवली. नातेवाईकांनी त्यांचा दत्तक पुत्र यशवंत यास शेवटचे अंतिम संस्काराचे विधी करण्यास नकार देऊन गोंधळ घातला. तेव्हा आपले दु:ख बाजूला सारून सावित्रीबाई स्वतः यशवंताचा हात धरून प्रेतयात्रेपुढे टिटवे घेऊन चालू लागल्या. ज्योतिबांच्या पार्थिवाला त्यांनी अग्नी दिला. भारताच्या इतिहासातील ही तेव्हाची एकमेव आणि अभूतपूर्व घटना म्हणता येईल.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी राष्ट्र विकासाचा उदात्त आणि अतिभव्य हेतू डोळ्यासमोर ठेवून जे कार्य उभारले होते ते सावित्रीबाईंनी पुढे नेटाने चालू ठेवले. 1897 साली पुण्यामध्ये प्लेगची भयंकर साथ पसरली. याकाळात सावित्रीबाईंनी मिलिटरीमध्ये वैद्यकीय सेवा देत असलेल्या आपल्या मुलास यशवंतास अहमदनगरहून प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी बोलावून घेतले. त्या स्वतः रुग्णसेवेत मग्न झाल्या. एका रुग्णाला आपल्या पाठीवर घेऊन त्या दवाखान्यात पोहोचवत होत्या तेव्हा या रोगाची लागण त्यांनाही झाली. यातच त्या ग्लानीत गेल्या आणि प्लेग होऊन त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एखाद्या शूर शिपायाने लढता लढता मरण स्वीकारावे तसेच वीर मरण त्यांनी कार्य करताना स्वीकारले. सतत 50 वर्षे लोकसेवेचे व्रत स्वीकारून चालणारी ही माऊली 10 मार्च 1897 रोजी काळाच्या उदरात विसावली. त्यांनी केलेले कार्य निश्चितच न भूतो न भविष्यती असे युगप्रवर्तक आहे!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या