नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
नांदगाव -संभाजीनगर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. कासारी ते तळवाडे मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने 7 कि.मी. अंतरासाठी तब्बल एक तास लागत असल्याने वाहनधारक अक्षरश: त्रस्त झाले असून वाहतूक कोंडीमुळे कसरत करत वाहन चालविण्याची वेळ आली आहे. खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत असल्याने तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कन्नड घाटातून जाणारी सर्व जड वाहतूक चाळीसगाव आणि नांदगावमार्गे सुरू झाल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. कासारी ते तळवाडे या रस्त्यावर 7 कि.मी. अंतरासाठी एक तासावर वेळ लागत आहे. कासारी ते तळवाडे वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडल्याने वाहन चालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षांपासून जड वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून जवळचा मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्याची अवस्था ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून अत्यंत दयनीय झाली आहे.
रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता अशी सध्याची अवस्था आहे. या रस्त्यावर वाहन चालविणार्या चालकांनी डांबरी रस्ते उखडून 10 इंचापासून ते 4 फुटांपर्यंत खड्डे पडल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. कधी वाहन खड्ड्यातून उसळून नियंत्रण सुटेल व अपघात होईल याचा नेम नाही. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनाला हादरे बसून तेही वारंवार नादुरुस्त होत असून चाक पंक्चर होणे ही तर नेहमीचीच बाब झाली असून यामुळे अतिरिक्त खर्च वाढला असल्याची तक्रार केली. संबंधित विभागाने या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांतर्फे केली जात आहे.