नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून व्यापारी तणावाची स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतावर सतत व्यापार करारासाठी दबाव टाकत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “भारत कधीही कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करत नाही,” अशी स्पष्टोक्ती पीयूष गोयल यांनी दिली. ते शुक्रवारी जर्मनीतील बर्लिन डायलॉगमध्ये बोलत होते.
पियुष गोयल काय म्हणाले?
भारत कोणत्याही व्यापारासंबंधी करारावर घाईने स्वाक्षरी करणार नाही. तसेच भारताचे व्यापाराचे पर्याय मर्यादीत करणाऱ्या सहकारी देशांनी घातलेल्या अटी नाकारल्या जातील असे विधान शुक्रवारी पीयूष गोयल यांनी केले. त्यांचे हे विधान अमेरिकेसारख्या बड्या भागीदार देशांबरोबर सुरू असलेल्या व्यापारासंबंधी वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे.
पियूष गोयल यांनी त्यांच्या अधिकृत भेटीदरम्यान बर्लिन ग्लोबल डायलॉगमध्ये बोलताना स्पष्ट केले की, व्यापार करार हे फक्त टॅरिफ किंवा बाजारपेठेत प्रवेशापुरतेच नसतात, तर ते विश्वास निर्माण करणे, दीर्घ काळासाठीचे संबंध आणि ग्लोबल बिझनेस कोऑपरेशनसाठी शास्वत फ्रेमवर्क तयार करण्याकरिता असतात.
भारत कोणत्याही देशाच्या दडपणाखाली करार करत नाही
बर्लिनमध्ये झालेल्या या चर्चासत्रात पीयूष गोयल म्हणाले, “भारत सध्या युरोपियन युनियन आणि अमेरिकासारख्या देशांशी आणि आर्थिक गटांशी व्यापार करारांबाबत सक्रिय चर्चा करत आहे. पण आम्ही घाईघाईत किंवा कोणत्याही देशाच्या दडपणाखाली करार करत नाही. प्रत्येक व्यापार करार हा दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिला गेला पाहिजे. भारत कधीही भावनात्मक किंवा राजकीय दबावाखाली निर्णय घेत नाही.”
“भारताने कधीही राष्ट्रीय हिताव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणावरून निर्णय घेतलेला नाही. जर कोणी मला सांगितले की, तुम्ही युरोपियन युनियनचे मित्र राहू शकत नाही किंवा केनियासोबत व्यापार करू शकत नाही, तर मी ते स्वीकारणार नाही. भारत अमेरिकेने लावलेल्या उच्च शुल्कांना तोंड देण्यासाठी नव्या आणि उदयोन्मुख बाजारपेठांचा शोध घेत आहे. भारताला जागतिक व्यापारात स्वतःचा प्रभावशाली स्थान निर्माण करायचे आहे आणि त्यासाठी “दीर्घकालीन टिकाऊ करार” हाच एकमेव मार्ग आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रशियाकडून तेल खरेदीवर स्पष्टच बोलले
रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की, “एखाद्या देशाकडून कोणते उत्पादन विकत घ्यायचे, हा निर्णय भारत स्वतः घेतो, कोणत्याही बाह्य दबावावर आधारित नसतो.” गोयल यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प भारतावर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्यासाठी दबाव आणत आहे. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या स्वतंत्र आणि आत्मनिर्भर परराष्ट्र व व्यापार धोरणाची ठळक झलक दाखवते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




