नाशिकरोड | प्रतिनिधी
नाशिक शहरात आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे, याकाळात कोट्यवधी भाविक हजेरी लावणार असल्याने त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, सुरक्षा आदी बाबत नियोजन सुरू असून भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याबाबत दक्षता बाळगली जात आहे. असे मत राज्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
येथील महसूल आयुक्त कार्यालयात डॉक्टर गोऱ्हे कुंभमेळा दरम्यान महिला व बालकांची सुरक्षितता स्वच्छता आणि इतर बैठकीच्या आढावा घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर, आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे कुंभमेळा नुकताच संपन्न झाला. या कुंभमेळ्यात दुर्दैवाने काही घटना घडल्या. चेंगराचेंगरी सारखे प्रकार घडले, अशा काही घटना नाशिक कुंभमेळ्यात घडू नये, यासाठी कशा उपाययोजन करता येतील याबाबत अभ्यासपूर्वक नियोजन करण्यात येत आहे.
कुंभमेळ्यात येणाऱ्या महिला,लहान बालक,अपंग भाविक यांच्यासाठी सुष्म नियोजन करण्यात येत आहेत. महिलांसाठी स्वतंत्र स्नान कक्ष, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सुरक्षित खोल्या उभारण्यात येणार आहे. महिला आखाड्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. पुरेसे पोलिस बळ, आरोग्य संबंधित सुविधा, मुख्य रस्त्यांवर सिसिटीव्ही कॅमेरे, रुग्णवाहिका, विविध भाषा मध्ये माहिती प्रसारित करणे, नाशिक शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून नोंदी करून त्यांचे महत्त्व यासाठी पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे, जेणेकरून बाहेर राज्यातून येणाऱ्या भाविकांना त्याची माहिती व्हावी, तसेच विविध सामाजिक संस्थांतर्फे धार्मिक प्रवचन, सत्संग, धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून स्थानिक कलावंताना व्यासपीठ उपलब्ध होईल व त्यांच्या कलागुंना वाव मिळेल तसेच भाविकांना कार्यक्रमांचा लाभ होईल असे देखील सांगितले.
बेहिशोबी रक्कम प्रकरणी एसआयटी स्थापन
धुळे येथे सापडलेल्या बेहिशोबी रक्कम बद्दल बोलतांना गोऱ्हे यांनी सांगितले की सरकारच्यावतीने एस आय टी स्थापन करण्यात आली असून रक्कम शासनाच्या ताब्यात घेण्यात आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व उपस्थित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे, तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रक्कम जास्त असल्याचा आरोप केल्याने त्यांना याप्रकरणात जास्त अभ्यास आहे असे बोलत गोऱ्हे यांनी राऊत यांची खिल्ली उडवली. तर पुणे जिल्ह्यात झालेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्ये बाबत महिला आयोगाने व पोलिसांनी वेळीच लक्ष देणे गरजचे होते असे मत त्यांनी याप्रसंगी मांडले.
राऊतांचे पुस्तक वाचायला वेळ नाही
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित केले आहे,या पुस्तकाबाबत विरोधकांच्या वतीने अनेक प्रतिक्रिया देण्यात येत आहे,या पुस्तकाबाबत गोऱ्हे यांना छेडले असता त्यांनी मला पुस्तक वाचायला वेळ नाही असे सांगत विषयाला बगल दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा