नाशिक | प्रतिनिधी Nashik
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हणजे लाखो शिवभक्तांचे श्रध्दास्थानआहे. अशातच श्रावण मासानिमित्त अनेक शिवभक्त त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होतात. श्रावण महिन्यात येथील फेरीला देखील विशेष महत्व असल्याने तिस-या श्रावणी सोमवारी तर लाखो शिवभक्त त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी तसेच फेरीकरिता जात असतात. या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरीता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
रविवारी(दि.१८) व सोमवारी(दि.१९) सलग दोन दिवस या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर मार्गे निमाणी या मार्गावर एकूण ३० बसेस सोडण्यात येतात. त्यानुसार या ३० बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर १०० फेऱ्या तर त्र्यंबकेश्वर ते नाशिकरोड १०० फेऱ्या अशा एकूण २०० फेऱ्या नियमित चालविण्यात येतात. या नियमित फेर्यांव्यतिरिक्त रविवारी(दि.१८) ५० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये निमाणी ते त्र्यंबकेश्वर एकूण ३० बसेस तर नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर एकूण २० बसेस जादा सोडण्यात येणार आहे. एकूणच रविवारी नियमित ३० तसेच जादा ५० अशा एकूण ८० बसेस त्र्यंबकेश्वर करीता मार्गस्थ करण्यात येतील.
तर सोमवारी(दि.१९)एकूण २९ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये निमाणी ते त्र्यंबकेश्वर १७ बसेस तर नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर १२ बसेस अशा एकूण २९ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. एकूणच सोमवारी नियमित ३० तसेच जादा २९ अशा एकूण ५९ बसेस त्र्यंबकेश्वर करीता भाविकांच्या सेवेकरिता मार्गस्थ होतील.
तरी भाविकांनी या नियमित व जादा बसेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच सदर दोनही दिवशी भाविकांची संख्या अधिक असल्याने प्रवाशांनी सुखकर प्रवासासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.