Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याब्रह्मगिरीच्या फेरीला जायचा प्लान करताय? बातमी तुमच्यासाठी...

ब्रह्मगिरीच्या फेरीला जायचा प्लान करताय? बातमी तुमच्यासाठी…

नाशिक । मोहन कानकाटे

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे (corona) बंद असलेली श्रावण सोमवारची ब्रम्हगिरी प्रदक्षिणा (Brahmagiri Pradakshina) यावर्षीपासून सुरु झाली आहे. प्रदक्षिणेसाठी भाविकांमध्ये (devotees) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

पहिल्या श्रावण सोमवारी (Shravan Monday) त्र्यंबकमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर आता ८ ऑगस्टला दुसरा व १५ ऑगस्टला तिसरा सोमवार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. अनेक भाविक पहिल्यांदाच ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी येत असल्याने त्यांना प्रदक्षिणेची आख्यायिका काय आहे? प्रदक्षिणा नेमकी कुठून सुरु होते? याची कुठलीही माहिती नसते. त्याबद्दलची माहिती यातून जाणून घेणार आहोत…

प्रदक्षिणेची आख्यायिका

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना (Sant Nivrittinath Maharaj) याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा (Yogiraj Gahininath) अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली, अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलित आहे. या प्रदक्षिणा कधी पुण्यप्राप्तीसाठी तर कधी पापक्षालणासाठी घातल्या जातात.

त्यातच सुमारे १५ ते २० वर्षांपासून तिसऱ्या श्रावण सोमवारीच प्रदक्षिणा करावी हा नवा पायंडा रूढ झाला आहे. यामध्ये विविध प्रकारचे समज-गैरसमज देखील आहेत. जसे सलग पाच वर्ष तिसऱ्या श्रावण सोमवारची प्रदक्षिणा केली तर लाभ होतो, असा प्रचार झाला आहे. वास्तविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी सारखाच लाभ देणारी आहे. त्यात श्रावणात केली तर अधिक चांगले असते.

विशेष म्हणजे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत) सह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या तीनही प्रदक्षिणेत ब्रम्हगिरी पर्वतास प्रदक्षिणा घालणे महत्वाचे आहे. याशिवाय प्रदक्षिणा मार्गावर प्रयागतीर्थ, सरस्वती तीर्थ, नागातीर्थ, रामतीर्थ, वैतरणा-बाणगंगा निर्मलतीर्थ, बानगंगा-धवलगंगा पद्मतीर्थ, नरसींह तीर्थ, बिल्वतीर्थ आणि नद्या लागतात.

प्रदक्षिणेला सुरुवात कशी कराल?

ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा साधारण २० किलोमीटरची आहे. श्रावण सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवारी किंवा सोमवारी पहाटे या प्रदक्षिणेला सुरवात केली जाते. प्रदक्षिणेला सुरवात करतांना पंच-पंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठून कुशावर्तावर स्नान करून ञ्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करावे. पहाटे पाच वाजता ही प्रदक्षिणा सुरू करावी. तिथून सरळ बाहेर पडल्यानंतर नाशिकच्या दिशेने चालत यावे. काही अंतर पार केल्यानंतर उजव्या हाताला प्रयागतीर्थ नामक कुंड (पेगलवाडी फाट्याजवळ) लागते. या प्रयागतीर्थ कुंडाला प्रदक्षिणा मारून भाविकांनी पहिणेच्या (Pahine) दिशेने वाटचाल करावी.

त्यानंतर पुढे जात एका तासाभरात उजवीकडे जाणारा रस्ता लागतो. एक रस्ता घोटीकडे (Ghoti) तर दुसरा रस्ता खोड्याळ्याकडे (Khodala) वळतो. त्याठिकाणी बाजूलाच भिलमाळ (Bhilmal) हे गाव लागते. भिलमाळ हे गाव सोडल्यानंतर काही अंतरपार केल्यावर धाडोशी (Dhadoshi) हे गाव लागते. येथून पुढे गेल्यानंतर मुख्य रस्ता (Road) सोडून उजव्या बाजूला सिमेंटच्या रस्त्याने पुढे जावे. पूर्वी हा रस्ता शेतातून जात होता. त्यावेळी भाविकांना चालणेही कठीण होत असायचे. मात्र, आता स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटचा रस्ता म्हणजेच प्रदक्षिणा मार्ग बनविण्यात आला आहे. हाच सिमेंटचा घाट सदृश्य चढण पार केल्यानंतर गौतमाच्या डोंगराच्या पायथ्याशी हा रस्ता थांबा घेतो. त्यानंतर या घाट माथ्यावर गौतम ऋषींचे (Gautama Rushi) छोटेसे मंदिर असून मंदिराचे दर्शन घेतल्यावर अर्धी फेरी संपते.

यानंतर तासाभराचे अंतर पार केल्यावर पुढे हा रस्ता आदिवासी पाड्यांमधून जातो. याचवेळी पुढे डांबरी रस्ता लागल्यानंतर छोटी-छोटी मंदिरे रस्त्यात लागतात. शेवटच्या टप्प्यात भाविक सापगाव (Sapgaon) गावाजवळ येतात. यानंतर मुख्य रस्त्याला लागल्यावर काही अंतरावर गणपतीचे मंदिर (गणपतबारी) (Ganpatbari) लागते. याठिकाणी भाविक दर्शन घेऊन पुढे त्र्यंबककडे मार्गक्रमण करतात. त्यानंतर भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) दाखल झाल्यावर पुन्हा कुशावर्तावर (kushavart kund) जातात त्याठिकाणी स्नान किंवा हातपाय धुतात आणि प्रदक्षिणा पूर्ण होते.

रात्री प्रदक्षिणा घालतांना काय काळजी घ्यावी

भाविकांनी रात्री प्रदक्षिणा घालतांना बॅटरी सोबत ठेवली पाहिजे. तसेच आपल्याला दररोज लागणारे गोळ्या (tablets) औषधे सोबत ठेवावी. याशिवाय रात्रीच्या सुमारास प्रदक्षिणा मारतांना भाविकांनी आपले मोबाईल, पाकीट सांभाळावे. तसेच रात्रीच्या वेळेस सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते यासाठी भाविकांनी पोलीस प्रशासनाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.

प्रदक्षिणा मार्गावर भाविकांसाठी चहा नाष्ट्याची मोफत व्यवस्था

प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर विशिष्ट टप्प्यांवर भाविकांसाठी विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने दरवर्षी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येते. यामध्ये चहा, खिचडी, पाणी बॉटल, उपवासाचे साहित्य यांचा समावेश असतो. विशेषकरून तिसऱ्या श्रावण सोमवारी जास्त प्रमाणावर भाविकांसाठी ही व्यवस्था केली जाते. तर काही ठिकाणी तेथील ग्रामस्थांकडून विविध स्टॉल, दुकानांच्या माध्यमातून भाविकांसाठी गरजू साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत असतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या