अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्लॉट घेऊन देतो असे सांगून प्लॉट दाखवून ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये घेऊन त्याची इसार पावती दिली नाही व प्लॉटचे मूळ कागदपत्रही देण्यास टाळाटाळ करुन प्लॉटची खरेदी न देता फसवणूक केली. ही घटना 16 जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान घडली.
याबाबत आरती गोविंदा लड्डा (वय 36, रा. दातरंगे मळा, नालेगाव) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या पतीने त्यांच्या ओळखीचे शिवाजी काळे यांना प्लॉट घ्यायचा आहे, असे सांगितल्याने त्याने त्यांच्या ओळखीचे योगेश गरुड व अरुण देठे यांना प्लॉट दाखवण्यास सांगितले. त्याप्रमाणे गरुड व देठे यांनी छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखर्डी येथे प्लॉट दाखवला व बाकीचे व्यवहार अमोल विजय वाघमारे (रा.पानसवाडी शनिशिंगणापूर, ता. नेवासा) यांच्या तारकपूर बसस्टॅन्ड येथील ऑफिसमध्ये करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पतीसह तेथे जाऊन व्यवहार ठरल्याप्रमाणे वाघमारे यांना 50 हजार रुपयाचा चेक, त्यानंतर 40 हजार रुपये रोख रक्कम व ऑनलाईन दहा हजार रुपये, तसेच वाघमारे यांना 50 हजार रुपये रोख दिले.
नंतर वाघमारे यांनी फिर्यादी यांना प्लॉट खरेदी करण्यासाठी मूळ मालका सोबत भेट घालून दिली नाही. तसेच दिलेल्या पैशाची इसार पावती करुन दिली नाही. फिर्यादी यांनी प्लॉटचे मूळ कागदपत्र मागितले असता वाघमारे यांनी कागदपत्र दाखवण्यास टाळाटाळ केली व प्लॉटची खरेदी दिली नाही. याबाबत फिर्यादी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता त्या अर्जाच्या सुनावणीनंतर तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरती लड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस नाईक देविदास आव्हाड करीत आहे.