राहाता |प्रतिनिधी| Rahata
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जिल्ह्यातील 5 लाख 41 हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 108.33 कोटी रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्र आत्मनिर्भर होत असून त्यांच्या प्रत्येक योजनेतून शेतकर्यांना पाठबळ देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. देशातील शेतकरी कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ना. विखे पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमास शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले, राज्यातील एकूण 92.89 लाख लाभार्थीना 1967.12 कोटी रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 5.41 लाख लाभार्थ्यांना 108.33 कोटी वितरीत झाले असून योजनेचा 19 वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने कृषी विभागाला मोठे पाठबळ दिले असून शेतकर्यांच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे देशात कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, कृषीभूषण सुदाम सरोदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सागर गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दादासाहेब खोगरे, शैलेश देशमुख, शांताराम सोनवणे, भरत दवंगे, डॉ. विठ्ठल विखे डॉ. विलास घुले डॉ. प्रियंका खर्डे, संज्जला लांडगे, कैलास लोंढे आदींसह शेतकरी उपस्थित होते. या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रयोगशील शेतकरी भागवत शेळके, राहुल कसाब, चंद्रकांत मुंढे, विनोद राऊत, वैशाली पर्वत, किशोर बेंद्रे, रोहिदास म्हस्के, अण्णासाहेब गोरे, बाळासाहेब गोरे, अनिल गागरे, करण दळे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी तर आभार डॉ. प्रियंका खर्डे यांनी मानले.