दिल्ली । Delhi
‘वंदे मातरम्’ या देशभावना जागवणाऱ्या ऐतिहासिक गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत आज विशेष महाचर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित करत ‘वंदे मातरम्’चे महत्त्व, स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका आणि त्यासंदर्भातील ऐतिहासिक घटनांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका करत काही ऐतिहासिक निर्णयांची आठवण उपस्थितांना करून दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “वंदे मातरम् या मंत्राने स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा मिळाली, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला. देशासाठी लढणाऱ्या लाखो लोकांना या गीताने प्रेरणा दिली. आज त्याचे स्मरण करणे आपले भाग्य आहे.” ते पुढे म्हणाले की, वंदे मातरमच्या 50 वर्षांच्या टप्प्यावर देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता आणि 100 वर्षांच्या टप्प्यावर आणीबाणीचे काळोख होते. मात्र 150 वर्षे पूर्ण होत असताना भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून तीव्र गतीने पुढे जात आहे.
या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी ‘वंदे मातरम्’च्या प्रभावाबाबत अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले की, “जगाच्या इतिहासात अशी कविता किंवा गीत नसेल, ज्याने अनेक दशकांपासून लाखो लोकांना एकाच ध्येयासाठी प्रेरित केले.” मोदींनी वीर सावरकर, भीकाजी कामा आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा प्रसार करण्यासाठी केलेल्या कामाचाही उल्लेख केला. वीर सावरकरांनी लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये हे गीत गायले, भीकाजी कामांनी पॅरिसमध्ये याच नावाचे वृत्तपत्र सुरू केले याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. ते म्हणाले की, “लहान मुलांनी प्रभातफेऱ्यांमध्ये ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, चाबकाचे फटके मारण्यात आले. बंगालमधून उठलेली ही हाक अखेर देशव्यापी चळवळ बनली.”
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने वंदे मातरमसोबत अन्याय केला, त्याचे तुकडे केले आणि तुष्टीकरणाचे राजकारण करत या गीताला वादांच्या गर्तेत ढकलले. मोदी म्हणाले, “काँग्रेस मुस्लिम लीगला शरण गेली. वंदे मातरमवरून वाद निर्माण करणाऱ्यांशी काँग्रेस जवळीक ठेवत होती. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच देश फाळणीच्या दिशेने ढकलला गेला.”
मोदींनी आपल्या भाषणात 1936 मधील लखनौमधील एका घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, 15 ऑक्टोबर 1936 रोजी मोहम्मद अली जिनांनी वंदे मातरमच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यानंतर काँग्रेसने या दबावाला झुकत प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान म्हणाले, “जवाहरलाल नेहरूंना मुस्लिम लीगची नाराजी दिसली आणि त्याऐवजी लीगला उत्तर देण्यापेक्षा त्यांनी वंदे मातरमवरच शंका उपस्थित केली. त्यांनी म्हटले की, वंदे मातरम् ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लीम समाजाला अस्वस्थ करू शकते.” मोदींनी सांगितले की, त्यानंतर काँग्रेसने 26 ऑक्टोबर 1936 रोजी कोलकात्यात बैठकीत वंदे मातरमच्या वापराचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आरोप केला की, हा निर्णयही जिनांच्या दबावाखाली घेतला गेला.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की, “वंदे मातरम् हे केवळ गाणे नाही, तर राष्ट्रभावनेचे प्रतीक आहे. यामुळे स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा लाखो भारतीयांना मिळाली. आज 150 वर्षे पूर्ण होताना त्याचे स्मरण करणे हे आम्हा सर्वांचे सौभाग्य आहे.” लोकसभेतील ही चर्चा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील एक महत्त्वाचा क्षण ठरला असून, वंदे मातरम् या गीताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी मूल्यांची पुन्हा एकदा उजळणी करण्यात आली.




