Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदी वायनाड दौऱ्यावर; भुस्खलनग्रस्त क्षेत्राची हेलिकॉप्टरद्वारे केली पाहणी

पंतप्रधान मोदी वायनाड दौऱ्यावर; भुस्खलनग्रस्त क्षेत्राची हेलिकॉप्टरद्वारे केली पाहणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काही दिवसांपूर्वी केरळमधल्या वायनाडमध्ये निसर्गाचे थैमान पहायला मिळाले होते. वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३० जुलैला मध्यरात्री भीषण भुस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेत किमान ३०० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. आता या घटनेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडमध्ये जात भुस्खलन प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी आज वायनाडमधल्या भुस्खलन प्रभावित क्षेत्रांची हवाई पाहणी केली आहे. भूस्खलनग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी त्यांनी पंचरिमट्टम, मुंडक्काई चूरलमला यासह इतर प्रभावित भागांची नोंद घेतली. इरुवाझिंजी पुझा (नदी) च्या उगमस्थानी झालेल्या भूस्खलनाची सर्वेक्षण केले. त्यांनी हेलिकॉप्टरमधून परिस्थितीचा आढावा घेतला. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी हेही पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित आहेत.

ते नागरिकांच्या पूर्नवसनासंदर्भातील परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत. याशिवाय रुग्णालयात दाखल जखमी नागरिकांची भेट घेणार असून भूस्खलन प्रभावित राहत असलेल्या निर्वासित छावण्यांनाही भेट देणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतर पंतप्रधान मोदी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.

पीएम मोदी एक आढावा बैठकही घेणार आहेत ज्यात मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याशिवाय राज्यातील वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत. आढावा बैठकीनंतर पंतप्रधान मोदी नवी दिल्लीला परत जाणार आहेत.

राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी या घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या