अयोध्या | Ayodhya
आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचे ऐतिहासिक आणि भव्य ध्वजारोहण करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर हा धर्मध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मोठ्या संख्येने साधू-संत उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. त्यांनी हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नसून भारतीय संस्कृती आणि रामराज्याच्या मूल्यांचे प्रतीक असल्याचे स्पष्ट केले.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर धर्मध्वज फडकला. कोविदार वृक्ष, तेजस्वी सूर्याची प्रतिमा चिन्हांकीत झालेला भव्य ध्वज विधीवत पूजन करून फडकवण्यात आला. ध्वजारोहणासाठी हजारो भाविक अयोध्येत जमले होते, प्रभू श्रीरामाचा जयघोष आणि मंत्रोच्चारांच्या साथीने मंदिरावर भव्य भगव्या रंगाचा धर्मध्वज फडकला.
दिर्घकाळाचे स्वप्न आता पूर्ण झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपले दीर्घकाळचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. भारतासह संपूर्ण विश्व आज राममय झाले आहे. प्रत्येक राम भक्ताच्या हृदयात अद्वितीय संतोष आहे आणि असीम कृतज्ञता तसेच अपार आनंद आहे. शतकानुशतके झालेले घाव आता भरत आहेत, वेदनेला आता पूर्णविराम मिळतो आहे. आज त्या यज्ञाची पूर्णाहुती आहे ज्याचा अग्नि ५०० वर्ष प्रज्ज्वलित होता असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पुढे मोदी म्हणाले की, “हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही, तो भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा ध्वज आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह, ‘ओम’ शब्द आणि कोविदार वृक्ष हे सर्व रामराज्याच्या वैभवाचे प्रतिरूप आहेत. हा ध्वज एक संकल्प आहे, एक यश आहे, निर्मितीसाठी संघर्षाची कथा आहे आणि १०० वर्षांच्या संघर्षाचे भौतिक रूप आहे.” पंतप्रधानांनी हा ध्वज केवळ वर्तमान क्षण नव्हे, तर भारताच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि रामराज्याच्या आदर्शांसाठी प्रेरणास्रोत राहील, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की,”येणाऱ्या हजारो शतकांपर्यंत, हा ध्वज भगवान रामाच्या मूल्यांचा प्रचार करेल. सत्य हेच धर्म आहे.”
वर्तमानासोबत भावी पिढ्यांबाबत विचार करायचा आहे
येत्या १००० हजार वर्षासाठी आपल्याला भारताचा पाया मजबूत करायचे आहे. आपल्याला वर्तमानासह भावी पिढ्यांबाबत विचार करायचा आहे. आपण नव्हतो तेव्हाही देश होता. आपण नसणार तेव्हाही देश राहिल. आपण जिवंत समाज आहोत. आपल्याला दूरदृष्टीने काम करायचे आहे. आपल्याला येणारे शतक, दशक लक्षात ठेवावे लागेल. त्यासाठी आपल्याला रामाचे व्यक्तित्व समजले पाहिजे. त्यांचा व्यवहार समजला पाहिजे.
राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे…
राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे सर्वोच्च चरित्र, सत्य आणि पराक्रमाचा संगम हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. राम म्हणजे जनतेचे सुख सर्वोच्च ठेवणे. राम म्हणजे धर्म आणि दया. राम म्हणजे ज्ञान आणि विवेकाची पराकाष्ठा, राम म्हणजे कोमलतेत दृढता. राम म्हणजे कृतज्ञतेचे सर्वोच्च उदाहरण. राम म्हणजे श्रेष्ठ संगतीची निवड. राम म्हणजे विनम्रतेत महाबल. राम म्हणजे सत्याचा संकल्प. राम म्हणजे जागरुक आणि शिस्तबद्धता, निष्कपट मन. राम केवळ फक्त एक व्यक्ती नाही. मूल्य आहे. मर्यादा आहे. दिशा आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित करायचे असेल. समाजाला सामर्थ्यवान बनवायचा असेल तर आपल्यातील राम जागृत केला पाहिजे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




