नवी दिल्ली | New Delhi
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) येथे १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात बुधवार (दि.२९) रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली.यात १७ भाविकांचा (Devotees) मृत्यू झाला असून ६० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दुःख व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट केली आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “प्रयागराज (Prayagraj) महाकुंभमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी (Devotees) आपल्या नातेवाईकांना गमावले आहे, त्यांच्या प्रति मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. त्याचबरोबर मी सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करण्याचे काम करत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी चर्चा केली आहे आणि सातत्याने राज्य सरकारच्या संपर्कात आहे”, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांच्यासोबत चर्चा केली. तसेच प्रयागराजवरून जास्तीत जास्त रेल्वे गाड्या सोडण्यात याव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना सहजपणे लवकरात लवकर शहराबाहेर पडता यावे, यासाठी जास्त रेल्वेगाड्या चालवण्यात याव्यात, अशी विनंती देखील योगींनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.