नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच (दि.२२ एप्रिल) रोजी जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये
दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तातडीने कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन पाच महत्त्वाचे निर्णय घेत पाकिस्तानची नाकाबंदी केली. हे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आपल्या भाषणातून पाकिस्तानाला थेट इशारा दिला.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे.संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. ज्यांच्यावर उपचार चालू आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठीही सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा, भाऊ आणि जोडीदार गमावला. त्यातील प्रत्येक जण वेगवेगळे भाषिक होते. या सर्वांच्या मृत्यूवर आपल्या सर्वांचे दुःख, आक्रोश एकसारखा आहे. त्यामुळे आता दहशतवाद्यांना ‘मिट्टी में मिलाने का वक्त आ गया है’ असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “हा हल्ला (Attack) फक्त पर्यटकांवरच (Tourist) झाला नाही तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे मी स्पष्ट शब्दात सांगतो की, ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली जाईल, शिक्षा मिळणारच. आता उरलेल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडण्याची वेळ आली असून त्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या प्रमुखांचे कंबरडे मोडून ठेवणार आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
तसेच “भारत (India) प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना शोधून काढेल आणि कठोर शिक्षा देईल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट
महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे. बिहारमधील ‘जिविका दीदी योजना’ सुरू आहे. बिहारच्या बहिणींच्या बचत गटाला १ हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यामुळे बहिणींच्या आर्थिक सशक्तीकरणाला बळ मिळेल. तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यासाठी फायदा होणार आहे. ज्या पंचायतीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले ते बिहार देशातील पहिले राज्य होते, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.