नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दिंडोरी व नाशिक लोकसभा (Dindori and Nashik Lok Sabha) मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा पिंपळगाव बसवंतमध्ये होणार आहे. हे अखेर निश्चित झाले असून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात बुधवारी (दि. १५) सभा होईल. त्यासाठी नाशिक ग्रामीण व शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पोलिसांनी (City and Rural Police) तयारी सुरु केली आहे. पाच दिवसांपूर्वीच पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Director General of Police Rashmi Shukla) यांनी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात या दौऱ्यासंदर्भात बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला होता. कांदा (Onion) प्रश्नामुळे नागरिकांमध्ये संताप असल्याने नाशिक ग्रामीणऐवजी शहरात मोदींच्या सभा स्थळाची चाचपणी सुरु होती. अखेरीस पोलिसांनी कडेकोट सुरक्षेचे नियोजन पूर्ण केल्यानंतर पिंपळगाव बसवंतच्या जागेवरच सभा निश्चित झाली आहे.
त्यानुसार ग्रामीण व शहर पोलिसांचा संयुक्त बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) व अधीक्षक विक्रम देशमाने यांनी त्यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय शाखा, दहशतवादी विरोधी कक्ष, राज्य गुप्तवार्ता, राज्य गुन्हे अन्वेषण यासह सर्व विभागांचा बंदोबस्त तैनात असेल. अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तामुळे वाहतूक मार्गात बदल केले जातील. सुरक्षेच्या कारणास्तव काही अटी-शर्ती व निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील नियोजन लवकरच स्पष्ट होणार आहे.
सभास्थळावर असा असणार बंदोबस्त
सभास्थळावर जॅमर, बीडीडीएस
शहर-ग्रामीणच्या सर्व पोलिसांचा बंदोबस्त
गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय विभाग सतर्क
‘एसआरपीएफ’, ‘एसएपीएफ’चीही मदत
शहर-ग्रामीण हद्दीत भाडेकरूंची तपासणी
सायबर कॅफे, बस स्थानके, रेल्वे स्थानकांची तपासणी
हॉटेल, लॉज, महत्त्वाच्या स्थळांची तपासणी
विविध गुन्ह्यांतील संशयितांना तंबी
सर्व सुरक्षा यंत्रणांशी समन्वय व चर्चा
एटीएस, राज्य गुप्तवार्ता, विशेष सुरक्षा विभागाशी चर्चा