नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज यावर विशेष चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणातून या चर्चेला सुरुवात केली. वंदे मातरम हा असा मंत्र होता ज्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला उर्जा आणि प्रेरणा मिळाली होती. त्याग आणि तपश्चर्या यांचा मार्ग दाखवला होता. अशा वंदे मातरमचे स्मरण करणे हे आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत म्हटले आहे. वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण केले.
ऐतिहासिक प्रसगाचे साक्षीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषणावेळी म्हणाले, “या चर्चेत सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही. या सभागृहात आपल्या सर्वांसाठी वंदे मातरम, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा आणि त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवणारा मंत्र, घोषवाक्य, वंदे मातरमचे स्मरण करणे हा एक मोठा भाग्य आहे.” ते म्हणाले, “वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपण सर्वजण या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण होत असताना आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
…तेव्हा वंदे मातरमनेच त्या प्रसंगातून बाहेर काढले
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची प्राथमिकता बदलली. पण भारताची प्रेरणा बदलली नाही. प्रत्येक संकटात वंदे मातरमच्या भावनेसह देश प्रगती करत राहिल. आजही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तो भाव दिसतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या लोकशाहीच्या पाठीत जेव्हा आणीबाणी नावाचा खंजीर खुपसला गेला तेव्हा वंदे मातरमनेच त्या प्रसंगातून बाहेर काढलं असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
बंगालच्या गल्लींमधून उठलेला हा आवाज अखेर संपूर्ण देशाचा आवाज बनला
मोदी पुढे म्हणाले, ‘लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वीर सावरकरांनी ‘वंदे मातरम्’ गायले. या नावाने वृत्तपत्रे काढली गेली, ज्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली होती. भीकाजी कामांनी पॅरिसमध्ये ‘वंदे मातरम्’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या गीताने देशात स्वावलंबनाची भावना रुजवली. लहान मुलेही प्रभातफेरी काढत ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत. त्यांना तुरुंगात डांबले जायचे, चाबकाचे फटके मारले जायचे. बंगालच्या गल्लींमधून उठलेला हा आवाज अखेर संपूर्ण देशाचा आवाज बनला.”
आणीबाणीमुळे देशाला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या
पंतप्रधान म्हणाले, “आणीबाणीमुळे देशाला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.” मोदी म्हणाले की, ही चर्चा केवळ सभागृहाची वचनबद्धता प्रकट करणार नाही तर जर आपण त्याचा सुज्ञपणे वापर केला तर भावी पिढ्यांसाठी शिक्षण म्हणूनही काम करू शकते. आपण नुकताच आपल्या संविधानाचा गौरवशाली 75 वा वर्धापन दिन साजरा केला. आज, देश सरदार पटेल आणि बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती देखील साजरी करत आहे. गुरु तेग बहादूर यांचा 150 वा शहीद दिवस. वंदे मातरमचा 150 वर्षांचा प्रवास अनेक टप्पे पार करून गेला आहे. जेव्हा वंदे मातरम पहिले 50 वर्षांचे होते तेव्हा देशाला गुलामगिरीत जगण्यास भाग पाडले गेले होते. जेव्हा वंदे मातरम पहिले 100 वर्षांचे होते तेव्हा देशाला आणीबाणीने बेड्या ठोकल्या होत्या.
मोहम्मद अली जिनांनी वंदे मातरमच्या विरोधात घोषणाबाजी केली
’15 ऑक्टोबर 1936 रोजी लखनौमधून मोहम्मद अली जिनांनी वंदे मातरमच्या विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना त्यांचे सिंहासन धोक्यात असल्याचे दिसले. त्यामुळे मुस्लिम लीगच्या निराधार विधानांचा तीव्र निषेध करण्याऐवजी, नेहरुंनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली. नेहरू म्हणाले होते की, वंदे मातरमची पार्श्वभूमी मी वाचली आहे आणि त्यामुळे मुस्लीम समाज अस्वस्थ होऊ शकतो. त्यानंतर काँग्रेसने जाहीर केले की, 26 ऑक्टोबरला कोलकाता येथील बैठकीत वंदे मातरमच्या वापराचा आढावा घेतला जाईल,’ लांगुलचालनाच्या राजकारणात काँग्रेस गुरफटलं. त्यामुळे भारत फाळणीसारख्या दुर्दैवी निर्णयाला सामोरा गेला, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली.
महात्मा गांधी १९०४ किंवा १९०५ च्या आसपास म्हणाले होते की वंदे मातरम हे इतके लोकप्रिय गीत झाले आहे की ते आपले राष्ट्रगीत झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले देशभरातल्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींसाठी महत्त्वाचे गीत झाले होते. राष्ट्रीय गीताप्रमाणे वंदे मातरम हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. देशभरातील लोकांनाही हे गाणे म्हणजे प्रचंड उर्जा आणि शक्ती देणारे गाणे वाटले होते. मात्र मागच्या पिढीने या गीतावर अन्याय केला असाही आरोप नरेंद्र मोदींनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




