नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेचे हिवाळी अधिवेशन आज पासून सुरु झाले आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार टीका केली. ” सभागृहात ड्रामा नव्हे डिलीव्हरी द्यायला पाहिजे,” असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
आजपासून सुरु झालेले अधिवेशन १९ दिवस चालणार आहे. या काळात अणुऊर्जा विधेयकासह दहा नवीन विधेयके सादर होणार अशी चर्चा रंगली आहे. तसेच, सात राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक सुधारणा यादीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची चर्चा असून SIR वरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची शक्यता आहे.
इथे ड्रामा नको तर डिलिव्हरी हवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “विरोधकांनी आपले मुद्दे उचलून धरले पाहिजेत. त्यांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे. एक-दोन पक्ष तर असे आहेत, जे पराभवाला पचवू शकत नाहीत. पराभवातून आलेली निराशा वाढू देऊ नका, तर विजयी लोकांनी अहंकार डोक्यावर घेऊ नका. नाटकं करण्यासाठी खूप जागा आहेत. पण, इथे ड्रामा नको तर डिलिव्हरी हवी आहे. संपूर्ण देशात जाऊन घोषणाबाजी करा. इथे घोषणाबाजी नव्हे तर धोरणांवर भर द्या. नकारात्कतेला मर्यादेत ठेवून राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न करा.” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.
भारत लोकशाही जगत आला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “संसदेचे हिवाळी अधिवेशन ही फक्त एक परंपरा नाही. हे अधिवेशन भारताला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम करेल. नुकतेच बिहार विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. लोकांनी मतदानातून लोकशाहीची सर्वात मोठी ताकद दाखवून दिली. विरोधी पक्ष मात्र बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून चिंतेत आहेत.” असे म्हणत त्यांनी पुन्हा विरोधकांवर टीका केली. “भारत लोकशाही जगत आला आहे, भारत म्हणजेच लोकशाही आहे आणि ही गोष्ट वारंवार सिद्ध होत आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली.” असेही ते पुढे म्हणाले.
देशातील जनतेने मला जबाबदारी दिली आहे
“अतिशय संतुलित पद्धतीने, जबाबदारीने, एक लोकप्रतिनिधी म्हणून, देशातील जनतेने मला ही जबाबदारी दिली आहे. ती हाताळताना, पुढे विचार करा, जे आहे ते आपण कसे चांगले करू शकतो. जर ते वाईट असेल तर आपण योग्य टिप्पणी कशी करू शकतो, जेणेकरून देशातील नागरिकांचे ज्ञान वाढेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
काही पक्ष नेते सत्तेत आले पण सत्ता मिळाल्यानंतर जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे
“गेल्या काही काळात आपल्या संसदेचा गैरवापर झाला आहे. काही लोकांनी निवडणुकीच्या तयारीसाठी तर काहींनी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी संसदेचा वापर केला आहे. आम्ही पाहात आहोत की काही राज्यांमध्ये जिथे काही पक्ष आणि नेते सत्तेत आले, पण, सत्ता मिळाल्यानंतरही त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यापैकी काहीजण जनतेचा सामना करण्यात असमर्थ ठरत आहेत. तेच लोक जनतेला सांभाळण्याऐवजी इथे संसदेत येऊन सगळा राग व्यक्त करत आहेत. काही खासदारांनी त्यांच्या राज्यांमधील अंतर्गत संघर्ष आणि राजकारण संसदेत आणून संसदेला त्यांच्या भांडणाचे व्यासपीठ बनवले आहे. ही एक अस्वस्थ परंपरा रुजवली जात आहे जी देशासाठी योग्य नाही.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




