नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. या निमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांसोबत संवाद साधून फराळही केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी देशातील नागरिकांना उद्देशून एक विशेष पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीनंतरची दुसरी दीपावली, भारतीय सेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचा उल्लेख आणि देशातील नक्षलवादाच्या समाप्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हंटले की, ही दुसरी दिवाळी आहे. “ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या या पवित्र दीपोत्सवानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अयोध्येत श्रीराम मंदिर बांधल्यानंतर ही दुसरी दीपावली आहे. भगवान राम आपल्याला धर्माचे पालन आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देतात. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येभारताने धर्माचं पालन करत अन्यायाचा बदला घेतला.”
“ही दीपावली विशेष आहे, कारण देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः ज्या भागांत पूर्वी नक्षलवाद आणि माओवादी हिंसा होती, तिथे प्रथमच दीप लावले जात आहेत. अनेक लोक हिंसेचा मार्ग सोडून संविधानावर विश्वास ठेवत विकासाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत.”या लोकांनी संविधानावर आस्था व्यक्त केली आहे. देशासाठी ही मोठी उपलब्धीच आहे. या सर्व यशांमध्ये गेलाया काही दिवसांपासून देशात नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्सची सुरुवातही झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटीत कपात करण्यात आली आहे. जीएसटी बचत उत्सवात देशवासियांचे हजारो करोड रुपये वाचले आहेत.
अनेक संकटातून जात असलेल्या जगात आपला भारत स्थिर आणि संवेदनशीलतेचे प्रतिक म्हणून उदयास आलेला आहे. येत्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यस्था होणार आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात एक नागरिक म्हणून देशाच्या प्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचे आपले दायित्व आहे.
आपण स्वदेशीचा अंगिकार केला पाहिजे. तसेच हे स्वदेशी आहे, असे आपण अभिमानाने म्हटले पाहिजे. आपण एक भारत, श्रेष्ठ भारताची भावना वाढवली पाहिजे. आपण प्रत्येक भाषेचा सन्मान केला पाहिजे. आपण स्वच्छतेचे पालन केले पाहिजे. आपण आपल्या आरोग्याला पहिले प्राधान्य दिले पाहिजे. आहारातील तेलाचे प्रमाण १० टक्के कमी करा. योग करा. हे सर्व प्रयत्न आपल्याला गतीपासून विकसित भारताकडे घेऊन जातील.
जेव्हा एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो, तर त्याचा प्रकाश कमी होत नाही, तर तो अधिक वाढतो. याच भावनेने आपल्याला या दिवाळीत आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला, सद्भाव, सहयोग आणि सकारात्मकतेचे दिवे लावले पाहिजे, हिच आपल्याला दिवाळी निमित्ताने शिकवण मिळते. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमचा,
नरेंद्र मोदी
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




