Monday, November 25, 2024
Homeब्लॉगसमर्पण...आजही टवटवीत

समर्पण…आजही टवटवीत

‘समजून घेण्याचे सारेच दरवाजे समर्पणाच्या अंगणात उघडतात…’ त्याला लिहिलेल्या पत्रातील ही शेवटची ओळ. तो माझ्या नातेसंबंधातला. त्याअगोदर जवळचा मित्र. गैरसमजाच्या धुक्यात हरवल्यामुळे त्याच्या हातून नकळत एक गंभीर गुन्हा घडलेला. त्यामुळे त्याची रवानगी पोलीस कोठडीत झालेली. पोलीसांची रीतसर परवानगी घेऊन त्याला भेटायला गेलो. त्या छोट्याशा बराकीत इतर गुन्हेगारांच्या सोबत तो अवघडून बसलेला. मला पाहताच त्याच्या मनाचा बांध फुटला आणि तो अगतिकपणे रडायला लागला. गयावया करू लागला. घडून गेलेल्या घटनेच्या पश्चात्तापात तो होरपळून निघत होता.

कालपर्यंत सामान्य जीवन जगणारा माणूस आज अचानक शिक्षेचा शिक्का घेऊन या विचित्र विश्वात आल्यामुळे तो अंतर्बाह्य ढवळून निघाला होता. त्या असहायतेतूनच तो तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता. शांत झाल्यावर त्याच्याशी काही जुजबी बोललो. काय बोलणार अशा वेळी? शब्द हरवून गेले होते. त्याने केलेल्या अमानुष कृत्याने मीही हादरून गेलो होतो. त्याच्या कुठल्याच गोष्टीला समर्थनाचा टेकू देण्यासारखी परिस्थिती नव्हती. अस्वस्थतेचं मळभ घेऊन माघारी फिरलो.

- Advertisement -

परतीच्या प्रवासात सगळा घटनाक्रम आठवत राहिला. त्याने अधिकच उदास होत गेलो. निराशेच्या वावटळीत भेलकांडत राहिलो. घरी आल्यावर टेबलाशी सुन्नपणे बसून होतो. का उचललं असेल त्याने असं आततायी पाऊल? विवेकाच्या सगळ्याच बिंदूंना कसं चकवलं असेल त्यानं? समजून घेण्याचे सारेच दरवाजे बंद केल्यानंतर हळूहळू उघडणाऱ्या गैरसमजाच्या खिडक्यांनी सगळा घात केला.

विवेकाचं बोट सोडून सुसाट निघालेले लोक समाजरचनेचा पाया उध्वस्त करताहेत. कौटुंबिक कलहांच्या मुळाशी अहंकाराचा विद्रूप राक्षस ठाण मांडून बसलेला आहे. तो माणसाला माणसापासून दूर नेतो आहे. नातेसंबंधांशी त्याला काहीच देणंघेणं नाही. ईर्षा, मोह, मत्सराच्या त्रिकोणी जबड्याने आयुष्याच्या निरपेक्ष सुंदरतेला गिळंकृत करायला सुरूवात केली आहे. खरं तर हे सगळं त्याच्याशी बोलायचं होतं. राहूनच गेलं.

लिहीत गेलो मग, त्याला उद्देशून आणि बरचसं मानसिक दृष्ट्या विकलांग झालेल्या समाजमनाला उद्देशून. समजून घेण्याच्या उंच कळसाचा ‘समर्पण’ हा पाया असतो. वादावर वादाचाच लेप थापल्याने कलह थांबत नाही तर जखमेप्रमाणे चिघळत जातो. संयम लव्हाळ्यासारखा असतो. कुठल्याही संकटाला विनम्रपणे निभावून नेता आलं पाहिजे. अहंकाराचे फुटवे वेळीच छाटून टाकता यायला हवेत. मग कुठलंही पाऊल उचलताना आपल्यावर अवलंबून असणारे घटक आणि एकूणच समाजव्यवस्थेकडे करूणार्द्र नजरेतून पाहिलं तर उचललेलं पाऊल कदापि वाकडं पडणार नाही. समोरच्याच्या भावनांना जपत गेलं, त्याच्या अंतःकरणात डोकावता आलं की आपोआप संवादाचे दरवाजे उघडायला सुरूवात होते. मग ‘चूक’ या शब्दाचं परिमार्जन होऊन त्याला ‘भूल’ ही संज्ञा प्राप्त होते.

समजून घेणं जेवढं अथांग तेवढंच सखोलही, समुद्रासारखं. समजून घेणाऱ्याच्या विशाल अंतःकरणातून आनंदाचे निखळ झरे वाहत असतात. समजून घेणं जेवढं सोपं तेवढंच कठीणही. समोरच्याची चूक आहे हे माहीत असूनही त्याची माफी मागणं याची एक सर्वोच्च श्रेणी असते. संत, महात्मे अशा परिघात वावरत असतात. त्या परिघाला तेच स्पर्श करू शकतात ज्यांचं अंतःकरण विशाल असतं. आपली प्रतिष्ठा, आपला बडेजाव, आपलं ‘मी’पण, आपलं अस्तित्व याचा होम केला की आपोआपच समर्पणाची यशोगाथा शब्दबद्ध होते.

‘समर्पण’ कविता ‘शब्दालय’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. सुप्रसिद्ध कवयित्री आणि संपादिका सुमती लांडे यांना ती भावल्याने त्यांनी आवर्जून कवितेला अंकात स्थान दिलं. वाङमयीन गुणवत्तेशी तडजोड न करणाऱ्या महाराष्ट्रभर पसरलेल्या शब्दालयच्या जाणकार परिवाराने कवितेचं तोंडभरून कौतुक केलं.

अहमदनगरच्या साहित्यविश्वात शिरण्याचा अरूंद मार्ग ‘समर्पण’ कवितेने प्रशस्त केला. डॉ. सुधा कांकरीयांच्या साईबनात छोटंसं कविसंमेलन होतं. आकाशवाणीचे लियाकत अली सय्यद माझ्यासोबत होते. कविता ऐकल्यावर डॉ. कांकरीया अतिशय प्रभावित झाल्या. त्यांना खूप काही बोलायचं होतं. परंतु त्यादिवशी त्यांचं मौन होतं. त्यांनी कागदावर भरभर लिहून तो प्रतिक्रियेचा मजकूर माझ्या हातात सरकवला. ‘समर्पण’ कवितेने कागदावर का होईना मौनाला अक्षरशः बोलकं केलं.

त्यादरम्यान पाथर्डीच्या श्री. तिलोक जैन ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत होतो. वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ होता. प्रमुख अतिथी यायला अजून बराच अवकाश होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ.नयनसुख गुगळे कवितेचे निस्सिम चाहते होते. पाहुणे येईस्तोवर कविता म्हणण्यासाठी त्यांनी मला व्यासपीठावर येण्याची विनंती केली. ‘समर्पण’ कविता विद्यार्थ्यांच्या अर्ध्याकच्च्या जाणीवांना स्पर्शून गेली. परंतु गुगळे साहेबांच्या उत्स्फुर्त कौतुकाचा मी विषय झालो. त्यांना विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. त्यांनी सरळसरळ विद्यार्थ्यांनाच कवितेच्या अर्थाची विचारणा केली.

अत्त्युत्तम प्रतिक्रियेसाठी बक्षीसही जाहीर केलं. एका चुणचुणीत मुलाच्या खुलाशावर खुष होऊन गुगळे साहेबांनी पाहुण्यांच्या हस्ते दोनशे रुपयांचं बक्षीस त्याला सन्मानपूर्वक प्रदान केलं. पंचवीस वर्षांपूर्वीचा तो सोहळा ‘समर्पण’ कवितेने माझ्या अंतःकरणावर प्राचिन शिलालेखासारखा कोरून ठेवलेला आहे.

तीस वर्षांपूर्वी लिहिलेली ‘समर्पण’ कविता आजही तेवढीच ताजी आणि टवटवीत आहे. मानवी स्वभाव, त्यांचा मनोधर्म, त्यांचा मनोव्यापार, त्यातील गुंतागुंत अजूनही तशीच आहे. मानवाच्या मूलभूत प्रवृत्तींना जागं करण्याचा वसा कवितेने घेतलेला असतो. आजही कुठे ‘समर्पण’ ऐकवल्यावर लोकांना ती त्यांच्या संग्रही हवी असते. ‘समर्पण’ कवितेने मानवी प्रवृत्तींचा मूलभूत आशय तिच्या परीने समृद्ध करण्याचा नेटका प्रयत्न केलेला आहे.

समर्पण

समजून घेण्याचे सारेच दरवाजे बंद केल्यानंतर

किलकिल्या होऊ लागतात हळूहळू

गैरसमजाच्या जुनाट खिडक्या.

वादावर वादाचाच लेप लावून

कलहाच्या जखमा बुजत नाहीत

तर आणखीनच गहिऱ्या होत जातात.

अशावेळी जोपासावीत मनाने संयमाची लव्हाळी

किंवा कराव्यात कलम झाडांच्या वाढलेल्या अवाजवी फांद्या

तेव्हा पाखरांबद्दल असणाऱ्या सहृदयतेवरच परजावी निर्णयाची कुऱ्हाड.

मी त्याला समजून घेतो म्हणून तो माझ्याशी

दरवाजे उघडे ठेवून बोलतो

मग त्याची एखादी चुकही

मी भूल समजून पचवतो.

नुसत्या पृष्ठभागावरून समुद्र वाचता येत नाही

तर त्यासाठी एखादी पाणबुडी होण्याचंही भाग्य लागतं.

समजून घेणं अथवा देणं इतकं निरर्थक आणि सोपं नाही

‘वाऱ्याने पाचोळा उडाला’

या साध्या घटनेमागे

वाऱ्याने देऊ केलेले असते आपले अस्तित्व पाचोळ्याला

तेव्हा कुठे पाचोळ्याला

उडण्याचा अर्थ प्राप्त होतो.

काही असो एवढं मात्र निश्चित

समजून घेण्याचे सारेच दरवाजे

समर्पणाच्या अंगणात उघडतात.

– शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या