नाशिक | प्रतिनिधी Nashik
बैलपोळ्याच्या सणानिमित्त तरुण, हौशी शेतकरी आपल्या बैलांच्या अंगावर चित्रपटांची नावे, अभिनेते, अभिनेत्री यांच्या नावांबरोबर म्हणीही रंगवतात. मात्र, यंदाच्या पोळा सणात चढवळेश्वर (ता. मालेगाव) येथील शेतकरी तात्यासाहेब बाबुराव पवार यांनी आपली बैलजोडी सजवताना ‘नाफेड गो बॅक’ असे घोषवाक्य लिहून नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेविरोधात अनोखा निषेध नोंदवला आहे.
अशा निषेधामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि नाफेडच्या अपारदर्शक धोरणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.हा अनोखा निषेध परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपले प्रश्न मांडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
नाफेडवरील गंभीर आरोप
नाफेडमार्फत दरवर्षी कांद्याचा बफर स्टॉक खरेदी केला जातो. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप तात्यासाहेब पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. ‘सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करते, पण नाफेडच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे,’असे पवार यांनी सांगितले.
बैलपोळ्यासारख्या सणादिवशी अशा पद्धतीने निषेध करावा लागणे ही खेदजनक बाब आहे. नाफेडच्या भ्रष्ट आणि अपारदर्शक खरेदीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान होते. हा लढा संपूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. सरकारने यापुढे पारदर्शक खरेदी प्रक्रिया लागू करावी किंवा नाफेडची कांदा खरेदी पूर्णपणे बंद करावी.
भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना




