Wednesday, October 16, 2024
Homeनगरबदली झालेले व संलग्न अंमलदार तात्काळ कार्यमुक्त करा

बदली झालेले व संलग्न अंमलदार तात्काळ कार्यमुक्त करा

एसपींनी काढले पुन्हा आदेश || प्रभारी अधिकारी पाळणार का?

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सन 2023 व सन 2024 मध्ये बदली करण्यात आलेल्या तसेच संलग्न म्हणून नेमणूक असलेल्या पोलीस अंमलदारांना तात्काळ त्यांच्या बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. दरम्यान, अधीक्षक ओला यांनी यापूर्वी देखील आदेश काढून बदली झालेले व संलग्न नियुक्ती असलेल्या अंमलदारांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलीस अधिक्षकांच्या आदेशाचे पालन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करत नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

अधीक्षक़ ओला यांनी पुन्हा सोमवारी (14 ऑक्टोबर) याबाबत आदेश काढले आहेत. जिल्हा पोलीस दलातील सुमारे पावणे पाचशे पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या जुलै 2024 मध्ये करण्यात आल्या. यापूर्वी देखील 2023 मध्ये सुमारे एक हजार पोलीस अंमलदाराच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तसेच इतर आदेशान्वये पोलीस अंमलदार यांच्या प्रशासकीय बदल्या व संलग्न नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. परंतु पोलीस ठाणे, शाखा प्रभारी अधिकारी यांनी संबंधित बदली झालेल्या काही पोलीस अंमलदारांना बदली ठिकाणी तसेच संलग्न नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणेकामी अद्यापपर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सदरचा आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, शाखा प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यासाठी काढण्यात आला आहे. सर्व प्रभारी अधिकारी यांनी आपल्या पोलीस ठाणे/शाखेचे पोलीस अंमलदार यांना बदली ठिकाणी किंवा संलग्न नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त न केल्यास त्या पोलीस अंमलदार व संबंधित प्रभारी अधिकारी यांचे ऑक्टोबर 2024 पासून वेतन रोखण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे संबंधित पोलीस अंमलदारांना तात्काळ बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्याशिवाय प्रभारी अधिकार्‍यांसमोर आता पर्याय राहिलेला नाही. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर वेतन रोखण्याची कारवाई केली जाणार असल्याचे आदेशच अधीक्षक ओला यांनी दिले आहेत.

हद्दीत बस्तान बसवले
प्रशासकीय बदली करण्यात आल्यानंतर काही अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र प्रभारी अधिकार्‍यांचे ‘खास’ म्हणून ओळख असलेल्या व पोलीस ठाणे हद्दीत आपले बस्तान बसविलेल्या अंमलदारांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. मात्र अधीक्षक ओला यांनी पुन्हा आदेश काढल्याने व वेतन रोखण्याचा इशारा दिल्याने त्यांना कार्यमुक्त करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे संबंधित बदली झालेल्या व संलग्न अंमलदारांना कार्यमुक्त न केल्यास प्रभारी अधिकारी याला जबाबदार असणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या