Thursday, February 5, 2026
HomeनगरBribe News : एका पोलीसाने आरोपीला स्वीकारायला लावली लाच

Bribe News : एका पोलीसाने आरोपीला स्वीकारायला लावली लाच

दुसरा पोलीस दादा रक्कम घेऊन पळाला || नाशिक पथकाची पाथर्डीत कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराने दरमहा हप्ता मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पोलीस अंमलदार लक्ष्मण सुखदेव पोटे (वय 35, रा. तारकेश्वर कॉलनी, पाथर्डी) यास रंगेहाथ पकडण्यात आले असून दुसरा पोलीस अंमलदार रामदास जयराम सोनवणे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) लाच रक्कमेसह पसार झाला आहे. विशेष म्हणजे, ही लाच सुरूवातीला पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीला स्वीकारण्यास भाग पाडले व त्यानंतर अंमलदार सोनवणे याच्याकडे देण्यास सांगितले.

- Advertisement -

तक्रारदार (वय 28, रा. पाथर्डी) यांचे शिवनेरी मिसळ नावाचे हॉटेल पाथर्डी येथे आहे. हे हॉटेल रात्री 10 नंतरही सुरू ठेवले जात असल्याने पोलीस अंमलदार लक्ष्मण पोटे याने हॉटेलवर कारवाई करण्याची धमकी देत तक्रारदाराकडून दरमहा दोन हजार रूपयांची लाच मागितली होती. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने 15 जून रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा करण्यात आल्यानंतर, पोटे याने दीड हजार रूपयांच्या तडजोडीवर लाच घेण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार, 17 जून रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. पोटे याने तक्रारदारास पाथर्डी येथील उपजिल्हा रूग्णालयात बोलावले व त्याच्यासमवेत असलेल्या पोलीस कोठडीतील संशयित आरोपी राहुल शिवाजी साबळे (वय 22, रा. शिक्षक कॉलनी, माळी बाळूळगाव, ता. पाथर्डी) याच्यामार्फत ही रक्कम स्वीकारण्यास सांगितले.

YouTube video player

दरम्यान, राहुल साबळे याने तक्रारदाराकडून दीड हजार रूपये स्वीकारले व ती रक्कम पोलीस अंमलदार रामदास सोनवणे याच्याकडे सुपूर्त केली. मात्र, सोनवणे ही रक्कम घेऊन पळून गेला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. लाचलुचपत विभागाच्या कारवाईदरम्यान लक्ष्मण पोटे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यासह रामदास सोनवणे आणि आरोपी राहुल साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंगारमध्ये खासगी व्यक्तीला पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने यशस्वी सापळा कारवाई करत बँकेच्या खासगी रिकव्हरी कर्मचार्‍याला 20 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. जहीर अहमद इक्बाल मुलानी (वय 30 रा. एकनाथनगर, केडगाव) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांना भिंगार मंडळ अधिकारी यांनी त्याच्या घराच्या जप्तीबाबत नोटीस बजावली होती. सदर नोटीसीची मुदत वाढवून देण्यासाठी मुलानी याने स्वतःला मंडळ अधिकारी यांचा प्रतिनिधी असल्याचे भासवत 20 हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर लाच रक्कम 20 हजार रूपये निश्चित झाली. मंगळवारी (17 जून) दुपारी तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम भिंगार परिसरात मुलानीकडे पंचासमक्ष दिली असता, लाचलुचपतच्या पथकाने मुलानीला रंगेहाथ पकडले. भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : भरदिवसा घरात घुसून महिलेचा विनयभंग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील केडगाव भागात एका विवाहितेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घर उघडे असल्याचा फायदा घेऊन एका व्यक्तीने घरात प्रवेश केला...