मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला बेड्या ठोकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून चाटे याला अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील (Kej Taluka) मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या (Murder) करण्यात आली होती. याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला होता. अटक (Arrested) करण्यात आलेल्या विष्णू चाटे याच्यावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. तसेच पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणीही चाटे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात केजजवळील तांबवा गावातील शिवारातून जयराम माणिक चाटे (वय २१ वर्षे) आणि महेश सखाराम केदार (२१ वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्या आरोपीला आणि आता चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी बीडच्या केज पोलिस ठाण्यात (Kej Police Station) आरोपी सुदर्शन घुलेसह ५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पोलिस निरीक्षक राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख यांच्यात भेट झाल्याचे दिसत आहे.