अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासींच्या विकासासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनेत बोगसगिरी करून साडेतीन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब चौकशीत उघड झाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालिन प्रकल्पाधिकारी भारमल, पावडे अन् प्रकल्प कार्यालयातील कर्मचार्यांविरोधात 5 फसवणुकीचे वेगवेगळे गुन्हे पोलिसांत दाखल झाले आहेत.
तत्कालिन प्रकल्पाधिकारी चंद्रकांत भारमल, तानाजी पावडे यांच्यासह राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी आरोपीच्या पिंजर्यात अडकले आहेत. सहाय्यक प्रकल्पाधिकारी रोहिदास साबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
आदिवासींच्या विकासासाठी शासन विविध योजना राबविते. त्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राज्यभर निर्माण करण्यात आली आहेत. या कार्यालयामार्फत आदिवासींना लाभ दिला जातो. आदिवासींच्या योजना राबविणार्या आदिवासी विकास प्रकल्पात घोटाळा झाल्याची एक तक्रार कोर्टात दाखल झाली होती.
त्या तक्रारीवरून कोर्टाने न्यायाधीश गायकवाड यांची समिती नियुक्त केली. या समितीने राज्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या कार्यालयांना भेटी देत कागदपत्रे तपासली. त्याचा अहवाल आदिवासी विकास प्रकल्प विभागाला सादर करण्यात आला.
त्यानंतर करंदीकर यांच्यासह 5 जणांची चौकशी समिती नियुक्त करून पुन्हा तपासणी करण्यात आली. या समितीने प्रत्येक कार्यालयांना भेटी देत लाभार्थी आणि वाटप झालेल्या रकमेची पडताळणी केली. या पडताळणीत हा घोटाळा उघडकीस आला.
राजूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तत्कालिन प्रकल्पाधिकारी चंद्रकांत भारमल, तानाजी पावडे, डीएसएच कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राजेश बावीस्कर, अब्दुल अतार, मनोहर तळेकर आणि कार्यालयातील कर्मचारी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.