नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जुन्या गंगापूर नाक्यावरील (Gangapur Naka) एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन नेल्याच्या घटनेचा काहीसा उलगडा झाला आहे. होम फायनान्सच्या कार्यालयात हाऊसकिपिंग करणाऱ्या कामगाराने बाहेरील संशयितांना तिजोरी व किल्लीच्या जागेची माहिती पुरविली. त्यानंतर संशयित तिघांनी चोरीचा प्लॅन आखून पूर्णत्वास नेला. या गुन्ह्यात हाऊसकिपिंग कामगाराचा ( Housekeeping Worker) प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्याला तिघांची माहिती मिळविण्यासाठी अटक (Arrested) करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुकाराम गोवर्धने (वय ३५, रा. उत्तमनगर, नवीन सिडको) असे संशयित हाऊसकिपरचे नाव आहे. त्याला सरकारवाडा पोलिसांनी अटक करुन न्यायालयात (Court) हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुना गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये (दि. ४) पहाटेच्या सुमारास लॉकरमधील २२२ ग्राहकांचे सुमारे ४ कोटी ९२ लाख रुपयांचे तेरा किलो सोन्याचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले होते. चाेरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानुसार रविवारी(दि.५) सरकारवाडा पोलिसात (Sarkarwada Police) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलीसांना (Police) तपासात बँकेभोवतीच संशयाची सुई फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलीसांनी फायनान्स कार्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांची चौकशी करुन जबाब नोंदविले. त्यात गोवर्धने हा विसंगत माहिती देत असल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने ओळखीतील तीन ते चार संशयितांना होम फायनान्सचे दरवाजे, खिडक्या, लॉकरची जागा, किल्ली ठेवण्याचे ठिकाण व सीसीटीव्हीची माहिती पुरविली. त्यानंतर इतर संशयितांनी ही चोरी (Theft) करुन दागिने चोरुन नेले. आता, मुख्य सूत्रधार लवकरच हाती लागण्याची शक्यता असून त्यातील संशयितांकडून सोन्याची रिकव्हरी केली जाणार आहे.
संशयित स्थानिक व सराईत
पाच कोटी रुपयांचे सोने घेऊन पसार झालेले इतर संशयित नाशिकमधील स्थानिक व सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची माहिती व नावे सरकारवाडा पोलिसांना मिळाली असून दोन पथके त्यांच्या मागावर रवाना झाली आहेत. संशयित सराईत आणि गोवर्धने यांची ओळख कशी झाली, चोरीचा डाव कोणी आखला याचा तपासासह गोवर्धनेला या चोरीतून किती हिस्सा मिळणार होता, याचा तपास सुरु आहे.
बैठक मारली अन् फिरवली किल्ली
एका संशयिताने ‘पीपीई कीट’ तर दुसऱ्याने हुडी घातलेली होती. पहिल्याने आत प्रवेश करुन चक्क फरशीवर बैठक मारली. तिथे जवळच असलेल्या दोन्ही किल्ली त्याने एकत्रितरित्या लॉकरला लावल्या. लॉकर उघडल्यावर दुसऱ्या संशयिताने पिशवी पुढे केली. त्यानंतर दोघांनी लॉकरमधील सोन्यांचे दागिने पिशवीत भरुन पुन्हा लॉकर बंद करुन किल्ली आहे तिथेच ठेऊन पळ काढला. चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागे असलेल्या ‘एसी’च्या खिडकीतून आत प्रवेश केला. तिथे कोणत्याही प्रकारची लोखंडी जाळी नव्हती. त्यामुळे काच खोलून आत शिरने चोरट्यांना शक्य झाले. बँकेतील ‘अलार्म’ चोरट्यांनी योग्य बटण दाबून बंद केला होता.