Saturday, May 18, 2024
Homeनगरपासपोर्टची साक्षांकित झेरॉक्स द्या, परवानगीशिवाय नगर सोडू नका

पासपोर्टची साक्षांकित झेरॉक्स द्या, परवानगीशिवाय नगर सोडू नका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या 2014 ते 2019 या काळातील संचालकांनी व संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्यांच्या पासपोर्टची साक्षांकित प्रत तातडीने जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संचालक वा अधिकार्‍यांनी पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय नगर सोडू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

बँकेतील 28 कर्ज प्रकरणांत सुमारे 150 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद बँक बचावकृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली असून, तिचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे. या तपासाच्या अनुषंगाने बँकेच्यासंचालक व अधिकार्‍यांना नगर न सोडण्याचे तसेच पासपोर्ट साक्षांकित प्रत जमाकरण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती देताना बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी सांगितले, 17 फेब्रुवारी 2022 रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात 150 कोटींची अफरातफर नगर अर्बन बँकेत झाल्याची फिर्याद दिली आहे. 28 कर्जप्रकरणात झालेल्या या अफरातफरीस 2014 ते 2019 या काळातील संचालक मंडळ जबाबदार असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे व या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करताना त्या पाच वर्षांच्या काळातील सर्वच कर्जप्रकरणांचे त्यांनी फॉरेन्सिक ऑडीटही सुरू केले आहे.

त्यासंदर्भातील प्राथमिक अहवाल न्यायालयास सादर झाल्या वर व त्यात दीडशे कोटीच्या फसवणुकीबद्दल गंभीर निरीक्षणे असल्याने संबंधित पाच वर्षांच्या काळातील संचालक व अधिकारी फरार होण्याची शक्यता आहे व आपल्या मालमत्तांची विल्हेवाटही लावण्याची शक्यता असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने संबंधित संचालकांनी त्यांच्या पासपोर्टची साक्षांकित प्रत जमा करावी, तसेच पोलिसांच्या परवानगीशिवाय नगर सोडू नये, असे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे असे आदेश दिल्याच्या वृत्तास या शाखेचे पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनीही दुजोरा दिला आहे.

पाच शाखा बंद होणार?

नगर अर्बन बँकेचे दोषी संचालक रिझर्व्ह बँकेचा आदेश झुगारून पुन्हा बँकेत संचालक म्हणून आले असून, यापैकी एक संचालक रिझर्व्ह बँकेचा नियम तोडून दोन संस्थांवर संचालक आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेने मागील सव्वा वर्षांपासून बँकेच्या कारभारावर निर्बंध घातले आहेत व आता या संचालक मंडळाला आणखी एक दणका बसण्याची शक्यता असून, बँकेच्या पाच शाखा लवकरच बंद होण्याची चिन्हे आहेत, असा दावा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला. बँक मल्टीस्टेट होण्यापूर्वी बँकेच्या 47 शाखा होत्या. प्रशासक कालावधीत सहा शाखा बंद झाल्या व आता आणखी पाच बंद होणार असल्याने बँकेच्या 36 शाखा आता राहण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

चौदा जणांवर निर्बंध

नगर अर्बन बँकेच्या 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळातील संचालकांपैकी सातजण पुन्हा 2021 मध्ये संचालक झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी लावलेले निर्बंध त्यांना पाळावे लागणार आहेत. याशिवाय 7 माजी संचालकही असून, त्यांनाही हे निर्बंध बंधनकारक आहेत. त्या कालावधीत बँकेचे 18 संचालक होते. त्यापैकी सुवालाल गुंदेचा, दिलीप गांधी, संजय लुणिया व राधावल्लभ कासट या चौघांचे निधन झाले आहे. त्यामुळे राहिलेल्या आजी-माजी 14 जणांपैकी विद्यमान अध्यक्ष अशोक कटारिया, शैलेश मुनोत, अनिल कोठारी, अजय बोरा, राजेंद्र अग्रवाल,मनेष साठे व दिनेश कटारिया या सात विद्यमान संचालकांसह दीपक गांधी, किशोर बोरा, अ‍ॅड. केदार केसकर, साधना भंडारी, विजयकुमार मंडलेचा, नवनीत सुरपुरिया व मीना राठी या सात माजी संचालकांना पोलिसांची बंधने पाळावी लागणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या