अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बुधवारपासून येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक व मैदानी चाचणीला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी 472 उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात 228 जणांनी चाचणीसाठी हजेरी लावली. त्यातील 22 जण शारीरिक चाचणी व कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरले तर उर्वरित 206 जणांनी मैदानी चाचणी दिली. दरम्यान पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीसाठी 244 उमेदवारांनी दांडी मारल्याचे दिसून आले. राज्यभरात एकाचवेळी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांनी एक पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेले असल्याने गैरहजर उमेदवारांचे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलीस शिपाई व 39 चालक शिपाई अशा 64 जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे. यात 19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात येत आहे. 64 जागांसाठी एकुण पाच हजार 970 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रक्रियेला सुरूवात झाली. पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक (नगर) प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह भरतीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, अंमलदार यावेळी उपस्थित होते.
भरतीचा पहिला दिवस असल्याने 472 उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. येथील पोलीस मुख्यालय मैदानावर शारिरीक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. केवळ 1600 मीटर धावणे ही चाचणी अरणगाव बायपास ते वाळुंज बायपास रस्त्यावर घेण्यात येत आहे. येथील मैदानावरून अरणगाव येथे जाण्यासाठी पोलीस व्हॅन ठेवण्यात आल्या आहे. मैदानी चाचणीसाठी येणार्या मुलांनी पोलीस मुख्यालय परिसर गजबजला आहे.
पहाटे पाच वाजेपासून भरती उमेदवारांना मैदानात प्रवेश दिला जातो. तेथे त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यानंतर छाती आणि उंचीचे मोजमाप केले जाते. यामध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना मैदानाच्या बाहेर जाण्यास सांगितले जाते. यानंतर पात्र उमेदवारांची चाचणी घेण्यात येते. गोळा फेक, 100 मीटर धावणे मुख्यालयाच्या मैदानावर घेतले जाते. 1600 मीटर धावण्यासाठी अरणगाव शिवारात नेले जाते. बुधवारी 206 उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. आज, गुरूवार सातशे उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.
राज्यभरात एकाचवेळी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांनी एक पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत. त्यामुळेच भरतीसाठी येणार्या उमेदवारांच्या संख्येत घट झाली असल्याचा अंदाज पोलीस अधीक्षक ओला यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एखाद्या उमेदवाराला एकाच दिवशी दोन जिल्ह्यात चाचणीसाठी वेळ दिली असेल, त्यांनी पहिल्या ठिकाणी चाचणी द्यावी. दुसर्या ठिकाणच्या चाचणीसाठी किमान चार दिवसांनी त्यांना तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल. याबाबत एक ईमेल आयडी व हेल्पलाईन क्रमांक देण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे.