Monday, November 25, 2024
Homeनगरपोलीस भरती : दुसर्‍या दिवशी 266 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

पोलीस भरती : दुसर्‍या दिवशी 266 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

314 उमेदवार गैरहजर || 30 ठरले अपात्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या शारीरिक व मैदानी चाचणीला दुसर्‍या दिवशी (गुरूवारी) 610 उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी 296 उमेदवारांनीच चाचणीसाठी हजेरी लावली. त्यातील 30 उमेदवार शारीरिक व कागदपत्रे पडताळणीत अपात्र ठरले तर उर्वरित 266 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. दरम्यान, दुसर्‍या दिवशी 314 उमेदवार चाचणीसाठी गैरहजर होते. जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलीस शिपाई व 39 चालक शिपाई अशा 64 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

- Advertisement -

यात 19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात येत आहेत. 64 जागांसाठी एकूण पाच हजार 970 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बुधवारी (19 जून) पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 206 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती. दुसर्‍या दिवशी 610 उमेवारांना बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र 296 उमेदवारांनीच मैदानावर हजेरी लावली. यामध्ये सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानांचा देखील समावेश होता. उपस्थित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात आली.

कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीत एकूण 30 उमेदवार अपात्र ठरले. त्यानंतर उर्वरित 266 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. दरम्यान, पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीसाठी 244 तर दुसर्‍या दिवशी 314 उमेदवारांनी दांडी मारल्याचे दिसून आले. राज्यभरात एकाचवेळी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केलेले असल्याने गैरहजर उमेदवारांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या