अहमदनगर | सचिन दसपुते| Ahmednagar
पोलीस शिपाई होण्यासाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता असताना नगर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई व पोलीस चालक शिपाई पदासाठी असंख्य उच्चशिक्षित तरूणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये एक हजार 365 पदवीधर, तर पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले 294 उमेदवार आहेत. पदवी मिळवूनही बेरोजगार असलेले हे तरूण पोलीस शिपाई होण्यासाठी मैदानात उतरले आहे.
नगर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलीस शिपाई व 39 चालक शिपाई अशा 64 जागांसाठी एकुण पाच हजार 857 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 19 जून पासून येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक व मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून भरतीसाठी येणारे तरूण – तरूणी यांना मैदानावर प्रवेश दिला जातो. त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून शारीरिक चाचणी घेतली जाते. यामध्ये काही उमेदवार अपात्र ठरतात. पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येते. पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या तरूणाला गोळाफेक, 100 मीटर व 1600 मीटर धावणे ही चाचणी द्यावीलागते.
तरूणींसाठी गोळाफेक, 100 मीटर व 800 मीटर धावणे ही चाचणी द्यावी लागते. पोलीस चालक शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या तरूणांना गोळाफेेक व 1600 मीटर धावणे ही चाचणी द्यावी लागते. त्यांची वाहन चाचणी सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पोलीस उपमुख्यालयाच्या मैदनावर पार पडणार आहे. दरम्यान, सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सरकारी नोकरी मिळणे खूपच अवघड झाले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरूणाईचा कल दिसून येत आहे. या भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. सुरक्षित नोकरी प्राप्त करून भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका पोलीस अधिकार्याने वर्तवली.
पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल झालेल्या उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये बी.फार्मसी 16, बी.ए. 1349, एम.कॉम 58, एम.ए. 151, एम.बी.ए 22, एम.सी.ए. 1, एम.सी.एस. 4, एमजे 1, एम.लॅब 02, एम.एम.एस. 1, एम.एस.डब्लू 4, एम.एस.सी 50 यांचा समावेश आहे.