अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील आश्वी, सोनई पोलीस ठाण्यासह साई मंदिर सुरक्षा, शिर्डीसाठी नवीन प्रभारी पोलीस अधिकारी देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरूवारी (5 फेब्रुवारी) एक पोलीस निरीक्षक व तीन सहायक पोलीस निरीक्षकांच्या मध्यावधी प्रशासकीय बदल्यांचे आदेश काढले आहेत.
आश्वी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांची बदली रिक्त असलेल्या साई मंदिर सुरक्षा, शिर्डी तसेच अति. कार्यभार बीडीडीएस, शिर्डी या पदावर करण्यात आली आहे. दरम्यान, आश्वी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षकावर देण्यात आली आहे. राहुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांना आश्वी पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची बदली राहुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांना सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे.
शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा व बीडीडीएसचे पद रिक्त होते. याची जबाबदारी शिर्डी वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्याकडे होती. आता शिर्डी साई मंदिर सुरक्षेची जबाबदारी निरीक्षक सोनवणे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे बीडीडीएसचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.





