अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बदली झाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना संलग्न नियुक्ती दिली असेल तर त्यांना तात्काळ बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना व त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले होते. मात्र, आदेश देऊन एक महिना होत आला असतानाही संलग्न पोलीस अधिकारी व अंमलदार आहे त्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. प्रभारी अधिकारी देखील त्यांना कार्यमुक्त करण्याचे नाव घेत नाही. वरिष्ठ अधिकार्यांनी आदेश काढूनही ठाणे प्रभारी अधिकार्यांनी त्यांचे आदेश धाब्यावर बसवले आहे.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बदली झाल्यानंतर इतर ठिकाणी संलग्न करण्याबाबतची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नसतानाही पोलीस ठाणे, विविध शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात अनेक अधिकारी व अंमलदार यांना विविध कारणांतून संलग्न करून घेतले जाते. जिल्हा पोलीस दलात अनेक ठिकाणी संलग्न काम करणारे अधिकारी व अंमलदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना संलग्न केल्यामुळे मूळ नेमणुकीस असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना काम करताना अडचणी निर्माण होतात. तसेच ज्याठिकाणी त्यांची मूळ नेमणूक असते तेथेही मनुष्यबळाची कमतरता निर्माण होते. यामुळेच अपर पोलीस महासंचालक सक्सेना यांचे आदेश प्राप्त होताच अधीक्षक ओला यांनी आदेश काढून संलग्न अधिकारी व अंमलदार यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश ठाणे प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत. जे प्रभारी अधिकारी संलग्न अधिकारी व अंमलदार यांना कार्यमुक्त करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.
मात्र अधीक्षक ओला यांनी काढलेल्या आदेशाला एक महिना होत आला असतानाही ठाणे प्रभारी अधिकारी संबंधित संलग्न अधिकारी, अंमलदार यांना बदली ठिकाणी कार्यमुक्त करत नाही. काही ठाणे प्रभारी अधिकार्यांनी ठरावीक अधिकारी व अंमलदारांना कार्यमुक्त केले आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी आजही संलग्न अधिकारी, अंमलदार काम करत असताना दिसून येत आहेत. आगामी सण- उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने संलग्न पोलिसांना त्यांच्या मूळ नेमणूकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आवश्यक असतानाही ठाणे प्रभारी अधिकार्यांकडून मात्र वरिष्ठांचे आदेशच मानले जात नसल्याचे दिसून येत आहे. यावर अधीक्षक ओला काय भूमिका घेतात. ज्या प्रभारी अधिकार्यांनी संलग्न अधिकारी व अंमलदार यांना कार्यमुक्त केले नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मागील महिन्यात अधीक्षक ओला यांनी सुमारे पावणे पाचशे पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या केल्या. संबंधित बदली झालेल्या पोलीस अंमलदारांना तात्काळ बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे आदेशही अधीक्षक ओला यांनी ठाणे प्रभारींना दिले होते. मात्र आजही बदली झालेले अनेक पोलीस अंमलदार आहे त्याच ठिकाणी कामकाज करत आहेत. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक कार्यमुक्त केले जात नसल्याचे दिसून येत आहे.