Sunday, June 23, 2024
HomeUncategorizedपोलिसांची तणावमुक्ती आणि स्मार्ट नियोजन

पोलिसांची तणावमुक्ती आणि स्मार्ट नियोजन

सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एरव्हीची कामं पाहून लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं, अतिसंक्रमित क्षेत्रात बंदोबस्त करणं, दुकानं बंद आहेत की नाहीत हे पाहणं अशी कामं पोलिसांना करावी लागत आहेत. विलगीकरण केंद्र, कोरोना उपचार केंद्रावरही पोलिसांची नियुक्ती असते. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांच्या अपेक्षित संख्येत आधीच कमतरता असताना आता आणखी कामं करावी लागत असल्यानं पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक ताण आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणं, गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोचवणं ही पोलिसांची खरी कामं; परंतु आता या कामांच्या बरोबरीने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, त्यांना सुरक्षा, रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन, धार्मिक स्थळी बंदोबस्त, अपघातस्थळी धावून जाणं, आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणं अशी नानाविध कामं करावी लागतात. यामुळे पोलिसांची कार्यक्षमता कमी होत असून त्यांच्या कामाचं मूल्यमापनही चुकीच्या पध्दतीने केलं जात आहे.

- Advertisement -

वस्तुत: पोलिस हा ही माणूस आहे. त्यालाही कुटुंब आहे. कुटुंबासाठी त्यानंही वेळ दिला पाहिजे; परंतु आपलं घर राहिलं बाजुला; रात्री-बेरात्री ड्युटी, कामाचे तास निश्चित नसणं, रास्त वेळी जेवणखाण न मिळणं, तुटपुंजा पगार, बंदोबस्ताच्या वेळी कमी भत्ता अशा अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात पोलिस अडकले आहेत. सामान्य नागरिक आणि पोलिस यांच्यात मैत्र असावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; परंतु पोलिस आपलं कर्तव्य बजावत असताना हेच सामान्य नागरिक कधी त्यांच्यावर हात टाकतात. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या फिरण्यावर बंदी असताना या नियमांची अंमलबजावणी करत असताना नागरिकांनी पोलिसांना मारलं. परिस्थिती प्रतिकूल असतानाही पोलिस आपलं काम करत आहेत. पोलिसांवर किती तरी हल्ले होतात. गुंडांना अनेकदा राजकीय संरक्षण असतं. अशा गुंडांचा बंदोबस्त करणं हे मोठं आव्हान असतं. राजकीय संरक्षण असलेले लोकच कायदा हातात घेतात. अशा लोकांचा बंदोबस्त करणं हे पोलिसांपुढचं एक आव्हान आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबर पोलिसही कोरोना बाधित होण्याचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात पोलिसांच्या मृत्यूचा आकडा सत्तरवर पोहोचला आहे. राज्यात चार हजार 938 पोलिस करोनाबाधित आढळले असून दोन हजार 600 पोलिस हे मुंबईतले आहेत. त्यातल्या तीन हजार 813 हून अधिकजणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. अतिसंक्रमित क्षेत्रात पोलिसांना ड्युट्या लावण्यात आल्या. त्यामुळे राज्य राखीव दल आणि पोलिसांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण जास्त आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावं यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटकाळात पोलिस रस्त्यांवर 24 तास कर्तव्य बजावत आहेत. असं असताना आता त्यांनादेखील वाढत्या कोरोना संसर्गाचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. टाळेबंदीत सगळे घरात बसले होते, तेव्हा पोलिस कोरोनासाठी संवेदनशील परिस्थिती असलेल्या रस्त्यांवर उतरून कर्तव्य बजावत होते.

राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, बंदोबस्ताचा प्रचंड वाढलेला ताण, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे वाढलेले प्रश्न आणि त्यातच होत असलेली आरोग्य सुविधांची आबाळ यामुळे पोलिस दलात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. राज्यकर्त्यांनीच नाही तर सामान्य जनतेनंही त्यांच्या अस्वस्थतेची दखल घेण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर उभं राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढणार्या पोलिसांवर प्रत्येक काम सोपवलं जात असल्यामुळे प्रचंड नाराजी आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत जीव धोक्यात घालून कार्यरत असताना पोलिसांना आरामासाठी 12 तास सेवेनंतर 24 तास आरामाचा फॉर्म्युला लागू करण्यात आला होता; मात्र हळूहळू विविध पोलिस ठाण्यांमध्ये 12 तास सेवा कायम ठेवत 24 तास आरामाचा फॉर्म्युला बंद होताना दिसत आहे. वयोवृद्ध पोलिसांना काम न देता सुटी देण्याचा निर्णयही काही ठिकाणी मागे घेतला गेल्याची तक्रार आहे.

याच सुमारास विविध प्रकारची कामं पोलिसांवर लादली जात असल्यामुळे कोरोनाबाधित परिसरासह इतरत्र बंदोबस्त ठेवताना नव्या जबाबदार्यांसाठी पोलिस कुठून आणायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एखादं संकट ओढवलं की सर्वसामान्यांच्या तोंडी पहिलं नाव येतं ते पोलिसांचं. ङ्गसद्रक्षणाय खलनिग्रहणायफ असं ब्रीदवाक्य मिरवणारे पोलिस ऊन, वारा, मुसळधार पाऊस अशा कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्परतेने पुढे सरसावतात; पण वाढत्या भाऊगर्दीत पोलिसांना आपलं कर्तव्य बजावणं जिकिरीचं ठरू लागलं आहे. व्हीआयपी बंदोबस्त, सण, मिरवणुका, मोर्चे, आंदोलनं हे सर्व सांभाळून शहरातली गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पण दिवसेंदिवस वाढत्या ताणामुळे पोलिसांचं खच्चीकरण होत असल्याचं दिसून येत आहे. अंगावर खाकी असली तरी वर्दीच्या आतला माणूस हा माणूसच असतो. त्यालाही भावना असतात, विवंचना असतात, वेदनाही असतात. त्यामुळे वाढता ताण आणि लोकसंख्येपुढे तुटपुंजं पोलिस दल फार काळ तग धरून राहणार नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

अपुर्‍या मनुष्यबळामुळे सध्या पोलिसांना आतोनात हाल सहन करावे लागत आहेत. राज्यात पूर्वीपासून चालत आलेल्या अहोरात्र ड्युटीमुळे पोलिसांचं कंबरडं पुरतं मोडलं होतं. जिल्हानिहाय हजारो पदांची भरती काढूनदेखील निवृत्तीचं प्रमाणही तितकंच असल्यामुळे समतोल साधणं अवघड जात आहे. त्यातच पोलिसांच्या कामाचं नियोजन होत नाही, कामात पारदर्शकता येत नाही तोपर्यंत परिस्थिती तशीच राहिल हे काही वेगळं सांगायला नको. संयुक्त राष्ट्रसंघानं एक लाख लोकसंख्येमागे 282 पोलिस हे प्रमाण निश्चित केलं आहे. महाराष्ट्रामध्ये 20 पोलिस आयुक्तालयं आहेत तर 33 जिल्हा अधीक्षक कार्यालयं आणि आठ परिक्षेत्रं आहेत. राज्यात पोलिसांच्या अंदाजे दोन लाख 12 हजार जागा रिक्त असून प्रत्यक्षात दोन लाख पोलिस कार्यरत आहेत. राज्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास एक लाख लोकसंख्येमागे अंदाजे 170 पोलिस असल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशमध्ये तर हे प्रमाण त्याहून कमी आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असल्यानं महिला पोलिसांचं प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र वस्तुस्थिती अशी की दोन लाख पोलिस कर्मचार्यांमध्ये महिलांचं प्रमाण फक्त 22 हजार आहे. हे चित्रही बदलण्याची गरज आहे.

वाहतूक कोंडीत अर्धा तास अडकलो तरी आपण अस्वस्थ होतो. पण वाहतूक आणि महामार्ग पोलिसांची ड्युटी तर अशाच वातावरणात सुरु असते. अपायकारक धुरळा, कर्णकर्कश्श हॉर्न, तापलेलं ऊन किंवा पावसाचा तडाखा त्यांना सहन करावा लागतो. सध्या पोलिस मुखपट्टी बांधतात. हा एक उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे हानिकारक प्रदूषणात थोडं संरक्षण मिळतं. श्वसनसंस्थेशी निगडीत तक्रारी आटोक्यात ठेवण्यास मदत होते. मात्र सततच्या आवाजाचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. काही आवाज ऐकू न येणं, थोड्या प्रमाणात ऐकू येणं असे प्रकार वाढतात. क्वचितप्रसंगी बधिरत्व येतं. याबरोबरच सततचे ताण आणि आवाजामुळे आजार जडतो. सततच्या तीव्र ध्वनिप्रदूषणानं रक्तदाब वाढू शकतो. हे टाळण्यासाठी कर्णेंद्रियांची क्षमता वाढवणं आणि टिकवणं महत्त्वाचं. सतत प्रदूषणात, कर्णकर्कश्श्य आवाजामध्ये, तळपत्या उन्हात उभं राहून काम करणं सोपं नाही. सततचे कष्ट आणि मानसिक ताण शरीराला त्रास देतात. त्वचा काळवंडते. घामाचं प्रमाण अधिक असल्यास धुलिकण जमून त्वचेवर पुरळ येतं. त्वचा तेलकट असल्यास खाज खूप वाढते. घाम आणि धूळ-धुरानं त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता बळावते. सूर्याच्या अतितीव्र किरणांमुळे अकाली वृद्धत्त्व येण्यास सुरुवात होते. केस गळणं, पिकणं, त्वचा सुरकतणं आदी विकार होतात. बदलत्या ड्युटीमुळे जेवणाच्या वेळा नियमित पाळल्या जात नाहीत. त्यामुळे झोपेचं आणि जेवणाचं तारतम्य रहात नाही. ड्युटीवरून आल्यावर जेवून झोपणं हाच बहुतांश पोलिसांचा दिनक्रम असतो. त्यामुले पचन नीट होत नाही. शरीरात मेदाची साठवण होऊ लागते. त्यामुळे वाहतूक आणि महामार्ग पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक ताण दिसून येतो. या ताणाला विविध मुद्दे कारणीभूत ठरतात. विश्रांतीचा अपुरा अवधी, डबल ड्युटी, घरातल्या माणसांशी अपुरा संवाद, त्यांची नाराजी अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होतो. दगडफेक, लाठीमार यामध्ये पोलिसांना अनेकदा दुखापतही होते. कामानिमित्त बाहेर असताना घरातल्यांच्या अडी-अडचणीला धावून जाणं शक्य न झाल्याने अपराधी वाटू लागतं. रस्त्यांवरील अपघातात जीवांची हानी बघितल्यानंही अस्वस्थ व्हायला होतं. हा ताण घालवण्यासाठी व्यसनांची मदत घेतली जाते, जी सर्वेतोपरी चुकीची ठरते. महामार्गांवर तैनात पोलिसांना तर ड्युटीच्या ठिकाणी शौचालयं, स्वच्छतागृहाची व्यवस्था उपलब्ध होतेच असं नाही. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो.

मध्यंतरी दर वर्षी पोलसांच्या आरोग्याची तपासणी करून त्याचा स्वतंत्र डाटा करण्याचं काम सरकारनं सुरू केलं होतं. पोलिसांच्या या आरोग्यपत्रिकेतून त्यांचे विकार, त्यावरील उपाययोजना आणि आरोग्यानुसार काम अशी पद्धत अवलंबली तर कार्यक्षमतेलाही वाव मिळेल. गरज आहे पोलिसांप्रती नवा निकोप दृष्टिकोन बाळगण्याची…

मंगेश पाठक

- Advertisment -

ताज्या बातम्या