Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Assembly Election 2024 : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

आघाडीच्या नेत्यांची बैठक, राणे-शिंदे यांची भेट

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांनी जाहीर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष लक्षात घेता महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी यांच्यात सत्तेसाठी अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

- Advertisement -

आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा बैठक घेऊन निवडणुकीत झालेल्या मतदानाचा आढावा घेतला. तर भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संभाव्य निकालांबाबत चर्चा केली. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला शुक्रवारी मुंबईत दाखल होत असून ते काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेऊन पुढील रणनीतीची चर्चा करणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या काही संस्थांनी राज्यात महायुतीला तर काही संस्थांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. लोकसभा निवडणूक आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकले. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष चाचण्यांच्या निष्कर्षांवर पूर्णपणे विसंबून नाही. परिणामी मतदानाची आकडेवारी बाहेर आल्यानंतर राजकीय पक्षांचे चाणक्य पुढील तयारीला लागले आहेत. मतदारांचा कौल त्रिशंकू असल्यास काय करायचे, सत्तेच्या जवळपास जाण्याइतके संख्याबळ मिळाले नाही तर छोटे पक्ष, अपक्ष आमदार यांची मदत कशी मिळवायची, आमदारांची फोडाफोडी, पळवापळवी रोखण्यासाठी कोणती उपाययोजना आखायची यावर सर्वच राजकीय पक्षात खल सुरु आहे.

अन्य राज्यात निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यास उशीर केल्यामुळे भाजपने यापूर्वी काँग्रेसकडून सत्तेचा घास हिसकावून घेतला होता. या अनुभवाने शहाणे होऊन काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत दाखल होणार आहेत. चेन्नीथला स्वतः शुक्रवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा करणार आहेत याशिवाय दिल्लीतून खुद्द काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संपर्कात राहणार आहेत. तर भाजपचे नेते अमित शहा हे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्याशी सतत संपर्क ठेवून राहणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शुक्रवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची रात्री उशीरा बैठक पार पडली. या बैठकीत संभाव्य निकाल आणि निकालानंतरच्या रणनितीवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीला बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देसाई, संजय राऊत, सतेज पाटील आदी नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीचे सरकार येणार : नाना पटोले
महाराष्ट्रातील पुढील सरकार महाविकास आघाडीचे असेल. जनतेचा कल काँग्रेसकडे असून पक्षाचे बहुतांश उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. ज्या पद्धतीने मतदानाचा कल येत आहे, लोक ज्या पद्धतीने सांगत आहेत, त्यावरून राज्यात सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार यात शंका नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या