अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील पिंजारगल्ली परिसरात राजकीय वादातून सुवेंद्र गांधीसह चौघांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी (13 जानेवारी) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत एका कारची मागील काच फोडून नुकसान करण्यात आले असून, चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोनक सतिष मुथ्था (वय 32, रा. चैतन्य कॉलनी, पुनमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रोनक मुथ्था यांचे आडते बाजार येथे दुकान असून, रात्री 12.40 वाजण्याच्या सुमारास दुकानाचे काम आटोपून घरी जात असताना पिंजारगल्ली परिसरात त्यांची भेट मित्र रोशन गांधी, सुवेंद्र गांधी व ओंकार जोशी यांच्याशी झाली. त्यावेळी चर्चा सुरू असतानाच राजकीय हेतूने सुवेंद्र गांधी यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने करण ऊर्फ बंटी सुनील ढापसे, पप्पु ढापसे, जितेंद्र सुनील ढापसे (सर्व रा. शिलाविहीर रस्ता, सावेडी) व भुषण अर्जुन ढापसे (रा. वंजार गल्ली, महादेव मंदिराजवळ) हे चौघे तेथे आले. संशयित आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत वाद घातला.
त्यानंतर करण ढापसे व पप्पु ढापसे यांनी हातात दगड घेऊन फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर दगडफेक केली. प्रसंगावधान राखून सर्वांनी दगड चुकवले; मात्र फेकलेले दगड फिर्यादीच्या वाहनाच्या मागील काचेला लागून नुकसान झाले. यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.





