Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्यासिन्नरला राजकीय समीकरणे बदलणार

सिन्नरला राजकीय समीकरणे बदलणार

सिन्नर । विलास पाटील Sinnar

- Advertisement -

अजितदादा पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत राज्यातल्या शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतरच्या राजकीय वादळात सिन्नरही सापडले आहे. तालुक्याच्या राजकारणात पुढील काळात बरीच उलथापालथ झालेली बघायला मिळणार आहे. तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेकांचे पत्ते उघड होऊ लागले असून तालुक्यातल्या सर्वच राजकीय पक्षांची गणिते बिघडलेली बघायला मिळाली तर आश्चय नको.

चार वर्षांपूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीत आ. कोकाटे यांना अनपेक्षित विजय बघायला मिळाला होता. त्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांच्याकडून पराभव झाल्याने दुखावलेले कोकाटे साडेतीन वर्ष तालुक्यात फिरकले नव्हते. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करीत त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, विधानसभेसाठी ही निवडणूक नांदी ठरली. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करणार्‍या कोकाटेंना जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांची साथ मिळाली. सातार्‍यातील शरद पवारांची पावसातली सभा कोकाटे यांच्यासाठी निर्णायक ठरली आणि कोकाटे यांना निसटत्या 2200 मतांनी चौथ्यांदा विधानसभेत घेऊन गेली.

या निवडणुकीनंतर अजितदादा-फडणवीस यांचा सरकार स्थापन करण्याचा डाव फसला. मात्र, त्यावेळी कोकाटे यांनी अजितदादांची केलेली पाठराखण पुढच्या काळात कोकाटे यांना चांगलीच कामी आली. पुढच्या सेना-राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री बनले आणि कोकाटे अजितदादांच्या गळ्यातले ताईत बनले. अर्थमंत्री असणार्‍या अजितदादांनी शेकडो कोटींचा विकास निधी देत कोकाटे यांनी केलेल्या राजकीय मदतीची परतफेड केली.

त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीसांचे सरकार आले, तेव्हा अजितदादांकडे विरोधी पक्षनेतेपद आले. त्यानंतरही कोकाटे त्यांच्याशी प्रामाणिक राहिले. शहा येथे कोकाटे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला अजितदादा, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर नेते उपस्थित होते. या मेळाव्यात कोकाटे यांनी अजितदादांकडे मंत्रीपद देण्याची मागणी केली, तेव्हा सर्वांनीच त्यांना वेड्यात काढले होते. मात्र, पुढे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होणार याची कुणकुण कोकाटे यांना आधीच लागली होती हे आता स्पष्ट झाले आहे. आता राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी कोकाटे यांनी अजितदादांसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्याच्या पुढच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तालुक्यात कोकाटे यांच्या आधीपासून राष्ट्रवादी कार्यरत होती. 14 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली तरी तालुक्यातल्या राष्ट्रवादीने शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार प्रकाशभाऊ वाजे यांना साथ दिली होती. नऊ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते राजाभाऊ वाजेंच्या विजयात सहभागी होते. मात्र, चार वर्षांपूर्वी कोकाटेंंनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हा तीन-चार गटात विखुरलेली राष्ट्रवादी एकसंघपणे कोकाटे यांच्या पाठीमागे उभी राहिली. माजी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे तालुक्यात कार्यरत असलेले गट कोकाटे यांच्यासोबत आले. अजितदादांच्या बंडानंतर हा अस्वस्थ असलेला जितेंद्र आव्हाडांचा गट कोकाटे यांच्यापासून दुरावणार आहे.

मात्र, त्याचवेळी भाजपाची सात कोकाटे यांना मिळणार आहे असं म्हणणं धाडसाचं ठरणार आहे. कोकाटे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक जयंत आव्हाड हे भाजपाचे सध्या तालुका प्रभारी असून विधानसभेसाठी पक्षाकडून प्रबळ दावेदार आहेत. तालुक्यात पक्ष बांधण्यासाठी त्यांनी चांगलेच परिश्रम घेतले आहेत. कोकाटे भाजपात होते, तेव्हा भाजपाच्या निष्ठावानांना डावलून स्वतःच्या राजकारणाला सोयीच्या ठरणार्‍यांना त्यांनी पक्षाची पदे बहाल केली होती. त्या काळात दुखावलेले सध्या भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे पदाधिकार्‍यांचे मनोमिलन होईल का हा प्रश्नच आहे.

राज्यात शिवसेना फुटली असली तरी तालुक्यात शिंदे गटाचा फारसा प्रभाव नाही. एकनाथ शिंदे यांच्यासह विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी सख्य असले तरी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी शांत बसत उद्धव ठाकरे यांच्या सेनेत राहण्याचा घेतलेला निर्णय आता त्यांना फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड शरद पवारांसोबत गेल्याने त्यांना मानणारा तालुक्यातला वर्ग राजाभाऊंसोबत जाऊ शकतो. कोकाटे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन तालुका अध्यक्ष व कोकाटे यांचे निष्ठावान कार्यकर्ते बाळासाहेब वाघ राजाभाऊंच्या सोबत गेले आणि बाजार समितीवरील पंचवीस वर्षाच्या सत्तेवर कोकाटे यांना पाणी सोडावे लागले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असणारे कोंडाजीमामा आव्हाड काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यात काँग्रेसची मर्यादित ताकद असली तरी या पक्षाने आघाडी धर्मपाळत मागच्या निवडणुकीत कोकाटे यांना मनापासून साथ दिली होती. कोकाटे यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक विनायक सांगळे गेल्या सात-आठ वर्षांपासून तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांचं मन कोकाटे यांच्या मागे असले तरी आता पक्षाच्या आघाडीमुळे त्यांना कोकाटे यांच्याबरोबर राहता येणार नाही. त्यामुळे नव्या शिवसेना उद्धव, राष्ट्रवादी पवार व काँग्रेस आघाडीसोबत अर्थात राजाभाऊंबरोबर त्यांना राहावे लागेल. कोकाटे यांनी अजितदादांची साथ देणे त्यांच्याच काही कार्यकर्त्यांना रुचलेले दिसत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या