मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले असून, ते आज रात्री राज्यपालांची भेट घेत मंत्र्यांचे राजीनामा सोपवतील. त्यानंतर आता नवीन मंत्रिमंडळ (Cabinet) स्थापनेच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज रात्री ९ वाजता गुजरातमध्ये पोहोचणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे उद्या (शुक्रवारी) सकाळी गुजरातमध्ये दाखल होतील. सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह १७ मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री असून, तेवढेच राज्यमंत्री (एमओएस) आहेत. गुजरातमध्ये जास्तीत जास्त २७ मंत्री बनवता येतात. त्यामुळे मंत्रिमंडळात नवीन सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दोन दिवस गांधीनगरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची अपेक्षा असलेल्या आमदारांना फोन देखील गेले आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात जवळपास १० मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. तर विद्यमान मंत्रिमंडळातील (Cabinet) अर्ध्या मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे.
नव्या मंत्रिमंडळाचा उद्याच शपथविधी
नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या (शुक्रवार १७ ऑक्टोबर) रोजी होणार असून, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आज रात्री राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आहेत. तर उद्या सकाळी ११.३० वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
काँग्रेस नेत्यांना मिळणार संधी?
नवीन मंत्रिमंडळात काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या अल्पेश ठाकोर, अर्जुन मोढवाडिया, सीजे चावडा आणि हार्दिक पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर गुजरातमधील पाटीदार आणि ठाकोर समुदायांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या मंत्र्यांचा होणार पत्ता कट
.गुजरात मंत्रिमंडळातील मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, पंचायत मंत्री बच्चूभाई खबर, वन आणि पर्यावरण मंत्री मुकेश पटेल, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भिखुसिंह परमार आणि आदिवासी विकास मंत्री कुंवरजी हलपती यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.




