मुंबई | Mumbai
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा (Land Scam) गंभीर आरोप केला आहे.पार्थ पवारांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये जमीन विकत घेतल्याचा, तसेच केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) भरल्याचा आरोप दानवेंनी केला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत चौकशीचे आदेश दिले आहेत.
यावेळी ते म्हणाले, “या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागवली असून महसूल विभाग असेल, आयजीआर असेल, लँड रेकॉर्ड्स असतील याबाबतची सर्व माहिती मागवण्यात आली आहे.यासंदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश देण्यात आले असून, ही सर्व माहिती आणि जी प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर सविस्तर माहिती माध्यमांना देण्यात येईल. प्रथमदर्शनी जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर असून त्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊनच बोललं पाहिजे असं सांगत आपण त्या दृष्टीनं माहिती मागवली असून त्यासंदर्भात शासनाची दिशा आणि कारवाई काय असेल याची स्पष्टोक्ती लवकरच केली जाईल असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Ambadas Danve : पार्थ पवारांनी १८०० कोटींची जमीन ३०० कोटीत खरेदी केली; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
पुढे ते म्हणाले,”उपमुख्यमंत्री देखील अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील, असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिले जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई (Action) केली जाईल”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पार्थ पवारांची प्रतिक्रिया काय?
अंबादास दानवे यांनी आरोप केल्यानंतर पार्थ पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही किंवा घोटाळा केला नाही” असे पार्थ पवार यांनी म्हटले.




