मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत (Local Body Election) मुक्त आणि पारदर्शक निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लोकशाही गुंडाळून टाकल्याने पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजप (BJP) महायुतीची (Mahayuti) सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Mahapalika Election) येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार (Candidate) बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
हे देखील वाचा : Nashik Politics : महापालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील दोन डझन नवखे उमेदवार रिंगणात
निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्व आहे. पण आता विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजप (BJP) आणि महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे असा पोलीस, प्रशासनाच्या मदतीने बेशरमपणाचा खेळ सुरु आहे. निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षीदार बनला आहे, अशी खंत सपकाळ यांनी व्यक्त केली.
… तर अजित पवारांनी बाहेर पडावे
महापालिका निवडणुकीत सत्तेतील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तेच एकमेकांवर टीका करत आहेत. हा प्रकार म्हणजे ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ असा आहे. त्यामुळे भाजपवर आरोप करणाऱ्या अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे नाहीतर भाजपने तरी अजित पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, असे सपकाळ म्हणाले.
हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर
राहुल नार्वेकरांवर कारवाई करा
संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. हे महाशय महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या नातेवाईकांसाठी अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहेत. विरोधकांना अर्ज भरू देण्यात अडथळा आणणे, विरोधकांना धमक्या देणे, पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारचे वर्तन नार्वेकर यांनी केल्याने केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचा पुनरुच्चार हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केला.




