नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) आज (बुधवारी) नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे मतचोरीच्या (Vote Chori) मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत हरियाणातील विधानसभा निवडणूक २५ लाख बोगस मतदारांच्या माध्यमातून चोरण्यात आल्याचा आरोप केला. तसेच एकाच व्यक्तीच्या नावे अनेक ठिकाणी मते पडल्याचा आणि बनावट नावांनी मतदार याद्या तयार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राहुल गांधींच्या आरोपांना हरियाणा निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.
हरियाणा निवडणूक आयोगाने (Haryana Election Commission) राहुल गांधींच्या आरोपांवर १५ मुद्द्यांत सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व दावे पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. आयोगाने एक्सवर (ट्विट) पोस्ट करून राहुल गांधींचे दावे फेटाळले आणि सविस्तर माहिती दिली. आयोगाने स्पष्ट केले की, “राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन आहेत. निवडणुकीतील प्रत्येक प्रक्रिया (मतदार यादी तयार करणे, पडताळणी, आणि निकाल जाहीर करणे) पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि सर्व पक्षांच्या देखरेखीखाली झाली आहे”, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, राहुल गांधींनी हरियाणात (Haryana) एका ब्राझिलियन महिलेने २२ ठिकाणी कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने मतदान केले.ही ब्राझिलियन महिला हरियाणाच्या मतदार यादीत (Voter List) काय करत आहे. हरियाणात २५ लाख मते चोरीला गेली, म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बोगस होता. हरियाणात एकूण २ कोटी मतदार असून, ५ लाख २१ हजारांहून अधिक दुबार मतदार सापडले आहेत, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
निवडणूक आयोगाने मांडलेले मुद्दे
१) निवडणुकीसाठी ०२ ऑगस्ट २०२४ रोजी मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
२) एसएसआर दरम्यान प्राप्त झालेल्या दावा आणि आक्षेपांची एकूण संख्या ४,१६, ४०८ होती.
३) बिएलओची एकूण संख्या – २०,६२९
४) अंतिम मतदार यादी २७ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
५) जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे ईआरओ विरुद्ध दाखल केलेल्या अपीलांची संख्या – ०
६) जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्ध सीईओकडे दाखल केलेल्या दुसऱ्या अपीलांची संख्या -०
७) उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत मतदारयादी अंतिम करण्यात आली आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसोबत शेअर करण्यात आली.
८) मतदान केंद्रांची एकूण संख्या – २०, ६३२
९) निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या – १,०३१
१०) सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींची एकूण संख्या -८६,७९०
११) मतदानाच्या दुसऱ्या दिवशी तपासणीदरम्यान उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची संख्या – ०
१२) मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींची संख्या – १०,१८०
१३) मतमोजणीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या – ५
१४) निकाल ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी घोषित करण्यात आला.
१५) निवडणुकीला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची संख्या – २३





