मुंबई | Mumbai
येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेटच्या जागेवर ३० मजली बिहार भवन (Bihar Bhavan) उभारण्याची योजना आहे. यासाठी सुमारे ३१४.२० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र, या बिहार भवनाला मनसेने (MNS) विरोध दर्शविला आहे. अशातच आता बिहारचे मंत्री अशोक चौधरी (Minister Ashok Chaudhary) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, मुंबईतील बिहार भवनाला विरोध करणारे हे सगळे फालतू आणि विकृत मानसिकतेचे लोक आहेत. हे भवन भावनेतून बनत आहे, अनेक राज्यात बिहार (Bihar) भवन बांधले जात आहे. मुंबईत बिहार भवन बांधून देणार नाही असे हे लोक म्हणत आहेत. परंतु, महाराष्ट् हा कोणाच्या बापाचा नाही. या देशात कुठे कोणाचीही जबरदस्ती चालणार नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजे आहेत का? आम्ही काहीही झालं तरी महाराष्ट्रात (Maharashtra) बिहार भवन बांधणारच, असे विधान बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी केले.
मनसे नेते अभ्यंकरांचे चोख प्रत्युत्तर
बिहारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी राज ठाकरेंबाबत विधान केल्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी वयाच्या ३५ व्या वर्षी पक्ष काढला. लोकसभेला भाजपने आग्रह केल्यावर पंतप्रधान मोदींना त्यांनी पाठींबा दिला. त्यामुळे चौधरी यांनी राज ठाकरेंचा गुण घ्यावा. तसेच चौधरी यांनी आधी आपले राज्य सांभाळावे, दुसर्यांना अक्कल शिकवू नये. स्वत:चे राज्य नीट सांभाळल्यावर कोणीही बाहेर जाणार नाहीत. देशभरात बिहारबद्दल काय बोललं जातं, हे एकदा त्यांनी जाणून घ्यावे. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा असून, देवाने तोंड दिलं म्हणून चौधरी यांनी काहीही बोलू नये, असे अभ्यंकर यांनी म्हटले.
कसे आहे बिहार भवन
मुंबईतील बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर ३० मजली बिहार भवन बांधले जाणार असून, त्यासाठी ३१४.२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी सुमारे २७५२.७७ चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. तसेच यामध्ये शासकीय कामकाजासाठी कार्यालये, बैठकींसाठी ७२ आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग, तसेच अत्याधुनिक पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असणार आहे. याशिवाय सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प आणि हिरवळीचे क्षेत्र या सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
अशोक चौधरी नेमके कोण आहेत?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दलाचे अशोक चौधरी हे ज्येष्ठ नेते आहेत. बरबिघा विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार (MLA) म्हणून निवडून आले आहेत. २०१४ सालापासून बिहार विधान परिषदेचे आमदार आहेत. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये त्यांनी भवन निर्माण आणि शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी संभाळली आहे. सध्या ते बिहार सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून कामकाज बघत आहेत.




