मुंबई | Mumbai
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. त्याबाबतची माहिती स्व:त राऊत यांनी सोशल मीडियावरून दिली होती. त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राऊत हे सार्वजनिक जीवनापासून दूर होते. सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला होता. त्यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावल्याचे दिसून आले होते. यामुळे अजूनही ते पूर्णपणे बरे झाल्याचे दिसत नाही.
याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीत ठाकरे आणि राऊत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
यावेळी ते म्हणाले, संजय राऊत आजारी असल्यापासून राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. ते सातत्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. संजय राऊतांना यूएस ला नेलं पाहिजे की अन्य काही केले पाहिजे, याबाबत माझ्याशी बोलत होते. आज तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आमच्या घरी (House) आले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. त्या दोघांमध्ये जवळपास २५ ते ३० मिनिटे चर्चा झाली. यावेळी राज ठाकरेंनी राऊत यांना ज्या प्रकारचा तुझा आजार आहे त्यानुसार तुला राहावे लागेल. लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा, असा सल्ला त्यांनी दिल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनीही केली विचारपूस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची मंगळवारी मुंबईत राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली.यावेळी मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र, त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकली नसल्याचे समजते.
उद्धव ठाकरेंनीही घेतली होती भेट
काही दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हणत ते लवकरच राजकारणात पुन्हा सक्रिय होतील, असे म्हटले होते.





